झोपलेल्या कुटुंबीयांचा काळ बनून आलेल्या कोब्राशी मांजरीने केला संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:43+5:302021-07-09T04:11:43+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पिंप्राळा परिसरातील प्रशांत कोळी यांच्या घरात बुधवारी मध्यरात्री तीन ते चार फुटाच्या ...

झोपलेल्या कुटुंबीयांचा काळ बनून आलेल्या कोब्राशी मांजरीने केला संघर्ष
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पिंप्राळा परिसरातील प्रशांत कोळी यांच्या घरात बुधवारी मध्यरात्री तीन ते चार फुटाच्या कोब्राने प्रवेश केला. सर्व कुटुंबीय रात्री २ वाजेच्या सुमारास झोपेत असताना व साप घराच्या आत आला असताना घरातील पाळीव मांजरीने कोब्राचा मार्ग अडवून त्या कोब्राला एकाच ठिकाणी थांबवून ठेवले. नंतर या कुटुंबातील सदस्यांना जाग आल्यानंतर तत्काळ शेजारी राहणाऱ्या सर्पमित्राला बोलावून त्या सापाला पकडण्यात आले. काळ बनून कोळी यांच्या घरात घुसलेल्या कोब्राशी संघर्ष करून, मांजरीने कोळी कुटुंबीयांचे एकप्रकारे प्राणच वाचविले आहेत.
शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रशांत चौक भागात राहणाऱ्या अनंत कोळी यांचे कुटुंबीय बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे झोपले होते. मात्र, रात्री २ वाजेच्या सुमारास अनंत कोळी यांच्या मुलाला घरात फूत्कारण्याचा आवाज आला. पहिल्यांदा दुर्लक्ष केल्यानंतर पुन्हा हा आवाज वाढतच गेला. नंतर उत्सुकतेने त्या आवाजाच्या दिशेने जात पाहणी केली असता, घरातील पाळीव मांजर तब्बल तीन ते चार फुटाच्या कोब्राचा मार्ग अडवून त्याच्याशी संघर्ष करत असल्याचे आढळून आले. हे दृश्य पाहून त्या मुलाचे अवसानच गळाले, कसातरी घरातील इतर सदस्यांना आवाज देऊन जागे केले. कुटुंबीयांनी देखील हे दृश्य पाहताच त्यांच्या पोटातही भीतीचा गोळा उभा राहिला.
मांजरीने केला अर्धा तास संघर्ष
अनंत कोळी यांच्या घरातील चार महिला या जमिनीवरच झोपल्या होत्या. त्यात रात्री घरात अचानक कोब्रा शिरला, झोपलेल्या महिलांपासून काहीच अंतरावर कोळी यांच्या घरातील पाळीव असलेल्या मांजरीने कोब्राचा पुढे जाणारा मार्ग अडवून ठेवला. कोब्राच्या प्रत्येक दंशाला मांजर देखील अंगावरचे सगळे केस ताठ करून फिसकारत होती. पंज्यांच्या साहाय्याने कोब्राचा मार्ग अडवून ठेवत होती. घरातच मांजर व कोब्राचा संघर्ष सुमारे अर्धा तास चालला.
सर्पमित्रांनी धाव घेत कोब्राला घेतले ताब्यात
घरात साप शिरला असल्याचे पाहत, घरातील सदस्यांनी शेजारीच राहणाऱ्या वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना बोलावण्यात आले. सोनवणेदेखील आपले सहकारी अजय साळवे यांना घेऊन ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत मांजर हवालदिल झाली होती. सोनवणे यांनी कुशलतेने कोब्र्याला आपल्या ताब्यात घेतले आणि कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. सकाळी दोन्हीही सर्पमित्रांनी कोब्र्याला सुरक्षित अधिवासात सोडले.
कोट..
पावसाळ्यात सर्प सुरक्षित अधिवास शोधत असतात त्याचबरोबर रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात. गेल्या महिनाभरात नागरिकांच्या घरात विषारी सर्प आढळून येत आहेत. त्यातही जमिनीवर झोपलेल्या नागरिकांच्या अंथरुणात सर्प आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जमिनीवर झोपणे टाळले पाहिजे.
- रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक