‘लिफ्ट’च्या नावाखाली चारचाकीतून लांबविली रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:13+5:302021-09-19T04:17:13+5:30
जळगाव : भुसावळ येथे जायचे आहे, असे सांगून ‘लिफ्ट’ मागणाऱ्या मोहम्मद इस्माईल निहाल अहमद (रा. गेंदालाल मिल) या तरुणाने ...

‘लिफ्ट’च्या नावाखाली चारचाकीतून लांबविली रोकड
जळगाव : भुसावळ येथे जायचे आहे, असे सांगून ‘लिफ्ट’ मागणाऱ्या मोहम्मद इस्माईल निहाल अहमद (रा. गेंदालाल मिल) या तरुणाने चारचाकीतून सुमारे साडेचार हजार रुपयांची रोकड चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना जळगाव-धुळेदरम्यान सायंकाळी घडली असून, आकाशवाणी चौकात वाहतूक पोलिसांनी वाहन थांबविल्यानंतर दंड भरण्यासाठी चालकाने पैशांचा शोध घेतल्यावर घटना उघडकीस आली.
गुजरात राज्यातील वापी येथील रमेश जीतनारायण यादव हे १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी नागपूर येथे जी.जे.१६-सी.एन. ४५१९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने रवाना झाले. शुक्रवार, १७ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांना धुळे-नाशिक रस्त्यावर एकाने भुसावळ येथे जायचे आहे, असे सांगून लिफ्ट मागितली. त्यानंतर १०.३० वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात रमेश यादव यांना वाहतूक पोलिसांनी थांबविले व सीटबेल्ट न लावल्यामुळे त्यांना दंड केला. दंडाची रक्कम भरण्यासाठी यादव यांनी वाहनातील ड्रॉवर उघडले असता, त्यातील साडेचार हजार रुपये गायब झालेले दिसून आले. हे पैसे शेजारी बसलेल्या लिफ्ट मागणाऱ्या तरुणाने चोरल्याचा त्यांना संशय आला व त्यांनी वाहतूक पोलिसांना तरुणाची अंगझडती घेण्यास सांगितले.
पैसे चोरीची दिली कबुली
वाहतूक पोलिसांनी तरुणाची अंगझडती घेतल्यानंतर शर्टाच्या वरच्या खिशात पैसे आढळून आले. त्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी खाक्या दाखविताच, त्याने आपण पैसे चोरल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याने मोहम्मद इस्माईल निहाल अहमद (रा. गेंदालाल मिल) असे नाव सांगितले. यादव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली व त्या तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केले. अखेर तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.