स्फोटप्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल; नऊ तासांनंतर सापडला दुसरा मृतदेह

By विजय.सैतवाल | Published: April 17, 2024 11:26 PM2024-04-17T23:26:24+5:302024-04-17T23:26:33+5:30

सुदैवाने दोघांना कोणतीही दुखापत नाही

Case filed against company owner, management in case of explosion | स्फोटप्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल; नऊ तासांनंतर सापडला दुसरा मृतदेह

स्फोटप्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल; नऊ तासांनंतर सापडला दुसरा मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार होण्यासह २२ जण जखमी झाल्या प्रकरणी  कंपनी मालक अरुण निंबाळकरसह व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा स्फोट बुधवार, १७ एप्रिल रोजी सकाळी ९:१० वाजता डब्ल्यू सेक्टरमध्ये झाला. या घटनेतील मयतांपैकी एक मयत दुपारी दोन वाजेच्या सुमारास सापडला तर दुसऱ्या मयताचा शोध संध्याकाळी सहा वाजता लागला. स्फोटाची तीव्रता व धगधगत असलेल्या फर्निश ऑईलच्या आगीमुळे दुसरा मृतदेह शोधण्यासाठी घटनेनंतर तब्बल नऊ तास लागले.

डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन बंब, रुग्णवाहिका दाखल झाल्या. सुरुवातीला जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दोन जण मध्ये अडकल्याची माहिती असल्याने त्यांचा शोध सुरू होता. त्या वेळी दुपारी दोन वाजता एका कामगाराचा मृतदेह सापडला. मात्र आणखी एका कामगाराचा शोध लागत नव्हता. त्यामुळे शोध कार्य सुरूच होते. अखेर संध्याकाळी सहा वाजता दुसऱ्या कामगाराचीही मृतदेह सापडला. या स्फोटामुळे जवळच असलेल्या आर.जी. इंडस्ट्रीज या कंपनीलाही झळ बसली आहे.  

दोघं बचावले
कंपनीत स्फोट झाला त्या वेळी कंपनीत एकूण २६ जण होते. त्यापैकी २२ जण जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झाला. यात अनिता गायकवाड या महिलेसह कपिल बाविस्कर यांना इजा झाली नाही. स्फोटाची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोउनि दत्तात्रय पोटे, रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, रामचंद्र बोरसे व अन्य सहकारी घटनास्थळी पोहचले. तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.

जखमींचे जबाब नोंदवले
या घटनेप्रकरणी जे बोलण्याच्या स्थितीत आहे, अशा जखमींचे एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जबाब घेतले. संध्याकाळपर्यंत सर्व प्रक्रिया सुरू होती.

मालक, व्यवस्थापक, प्रशासन अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
कंपनीतील स्फोटप्रकरणी कपिल राजेंद्र पाटील (२४, रा. आव्हाने, ता. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक लोमेश सुकलाल रायगडे,  प्रशासकीय अधिकारी अनिल गुलाब पवार या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात  सदोष मनुष्य वधासह कलम २२५, २८३, २८५, ३३७,  ३३८ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित करीत आहेत.

डीएनए चाचणीसाठी नमुने पाठवणार
स्फोटातील मयताच्या डीएनए चाचणीसाठी त्यांच्या रक्ताचे अथवा केसांचे नमुने नाशिक येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी चार दिवस लागू शकतात, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली. दोघही मृतदेहांचे गुरुवार, १८ एप्रिल रोजी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
 
मदतीसाठी सरसावले उद्योजक
कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योजकांसह परिसरातील उद्योजक मदतीसाठी सरसावले. आग नियंत्रणात आणण्यासाठी ठिकठिकाणच्या अग्नीशमन दलाचे बंब दाखल झाले. त्यासोबतच उद्योजक समीर साने, राजेश अग्रवाल, संजय व्यास यांच्यासह जैन उद्योग समूह, सुप्रीम इंडस्ट्री, बेंझो केमिकल, बालाजी चटई या उद्योगांनी मोठ्या प्रमाणात फोम उपलब्ध करून दिले. एक ते दीड हजार लिटर फोमचा मारा करण्यात आला. त्यातून आग नियंत्रणात आणण्यास मदत झाली. तसेच कंपनीच्या आतील आग विझवण्यासाठी भिंत पाडावी लागणार असल्याने त्यासाठी सागर चौधरी यांनी कोणताही मोबदला न घेता पोकलँड उपलब्ध करून दिले. तसेच माजी नगरसेवक आशुतोष पाटील, रिपाइं आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी मदत कार्य केले.

नियम बदलाचा मोठा फटका
ज्या उद्योग, प्रकल्पांमध्ये ज्वलनशील, स्फोटक पदार्थांचे उत्पादन, निर्मिती होते, त्या ठिकाणी प्रत्येक सहा महिन्यांनी तपासणी केली जात असे. मात्र मध्यतंरी शासनाने यात बदल केला व ही तपासणी बंद झाली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून बॉयलर, विद्युत उपकरणे, टॅंक, मशिनरी यांची निगा, तपासणीबाबत गांभीर्य ठेवत नाही व एखादी गंभीर घटना घडते, अशी माहिती अखिल भारतीय मजदूर संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर बानासुरे यांनी दिली. कंपन्यांमध्ये आवश्यक बाबींची वेळोवेळी तपासणी झाली तर अशा घटना टाळता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. बुधवारी केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाची कारखाना निरीक्षक, उपसंचालक स्तरावरून चौकशी व्हावी व जखमी, मयतांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, अशी मागणी बानासुरे यांनी केली आहे.


कंपनीचे मालक अद्याप आलेले नाही. व्यवस्थापक असल्याने त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक.

Web Title: Case filed against company owner, management in case of explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट