प्रशासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जि.प.च्या सर्व अधिकार्यांनी जळगाव पंचायत समितीमध्ये सभा घेतली. यात आरोग्य, ग्रा.पं. आणि शिक्षण विभागाच्या तक्रारींसंबंधी सीईओ आस्तिककुमार पांडेय चिडले.
.. तर ३0२ चा गुन्हा दाखल करणार
जळगाव : प्रशासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जि.प.च्या सर्व अधिकार्यांनी जळगाव पंचायत समितीमध्ये सभा घेतली. यात आरोग्य, ग्रा.पं. आणि शिक्षण विभागाच्या तक्रारींसंबंधी सीईओ आस्तिककुमार पांडेय चिडले. दुर्लक्ष, चालढकल यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ यांना धोका निर्माण झाला तर संबंधित कर्मचार्यांविरुद्ध ३0२ म्हणजेच खुनाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा पांडेय यांनी दिला. यामुळे कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली. छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवारी सकाळी हा कार्यक्रम सुरू झाला. जळगाव तालुक्यातील जि.प.सदस्य लीलाबाई सोनवणे, लिना महाजन, सभापती हिराबाई मोरे, सीईओ पांडेय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील व इतर सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. दुपारी २.३0 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. सभेत कंडारीत शिक्षकांचा अभाव, आव्हाणे येथे मागासवर्गीय वस्तीत घरांसमोर सांडपाणी असते, म्हसावद आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचारी नसतात आणि नशिराबाद शाळेत शालेय पोषण आहाराची दुरवस्था असल्याच्या तक्रारी आल्या. आव्हाणे येथील तक्रारदाराने तर सांडपाण्याची छायाचित्रे सभेत दाखविली. ग्रामसेवकांबाबत नाराजीही व्यक्त केली. या तक्रारींमुळे सीईओ चिडले. गटविकास अधिकारी बी.ए.राठोड यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. दुर्लक्ष करू नका. मला २८ दिवस झाले. आता तरी सुधारा.. पुढे काहीही ऐकून घेणार नाही, अशी ताकीद सीईओंनी दिली. तसेच विद्यार्थी, ग्रामस्थांच्या आरोग्याच्या जिवाशी खेळ झाला तर थेट खुनाचा गुन्हा दाखल करायला लावेल, असा दमही भरला. आपल्या दारी कार्यक्रमात विदगाव येथील एक दारूड्या शिरला. त्याने पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाबाबत प्रश्न उपस्थित केले. कुठे आहे स्वच्छता वगैरे बोलू लागला. कार्यक्रमात व्यत्यय येऊ लागल्याने संबंधित दारूड्याला सीईओंच्या आदेशानुसार बाहेर काढण्यात आले. शालेय पोषण आहार व्यवस्थितपणे द्या, असे गटशिक्षणाधिकार्यांना खडसावले. तसेच आरोग्यासंबंधी निष्काळजीपणा करू नका, अशी सूचना आरोग्याधिकार्यांना दिली.