परवा फेसबुकवरती एक पोस्ट वाचण्यात आली. उन्हाळ्याच्या सुटीत वेगवेगळ्या क्लासेसमध्ये किंवा छंदवर्गामध्ये पोरांना घेऊन जाणा:या पालकांकडे बघून म्हणे ‘कार्बाईड टाकून हिरवे आंबे घाईने वेळेआधी पिकवणा:या व्यापा:यांची आठवण येते! ‘फेसबुकादपि सुभाषितम् ग्राह्यम्’.. ही आंब्यांची उपमा मुलांना देण्याची मूळ कल्पना कुणाची, हे माहिती नाही, पण त्याला मानलं पाहिजे. अगदी चपखल उपमा आहे. आणि त्याहून योग्य उपमा आहे, ‘व्यापा:यांची’. हे व्यापारी म्हणजे पालक की क्लासचालक की दोघेही, हे ज्याने-त्याने मनाशी ठरवावं. व्यापा:याला आंबा गोड आहे की, आंबट आहे; की बेचव आहे, याच्याशी काहीही कर्तव्य नसतं. त्याला तो खायचा नसतोच- फक्त ‘खपवायचा’ असतो. म्हणूनच कार्बाईड पावडर टाकून त्याचा रंग केशरी झाला की, तो पिकल्यासारखा दिसतो. एवढंच व्यापा:याला पुरेसं असतं. कारण मग गि:हाईकांच्या संतोषासाठी टोपलीत लाल कागदावरती रचावे, तसेच हे वरवर पिकलेले आंबे, वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर रचता येतात. छान, संपूर्ण पान भरून ‘पासपोर्ट साईज’चे आंबे ओळीत रचलेले असतात-
‘‘या हो, या.. सा:यांनी या, बघा, बघा आमचे आंबे बघा. कितीही कच्चे पाठवा- पिकवण्याची आमची ग्यारंटी. प्रत्येक आंबा निदान नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकणारच! हे बघा इथे मांडलेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकलेले, मागच्या अढीतले छान-छान आंबे.. आम्हाला विसरू नका.. आंबे पिकवण्यात आम्हीच नंबर वन!’’
ते पेपरमधले आंबे पाहिले, की कसे सगळे मंत्रमुग्ध होऊन जातात. प्रत्येकालाच इच्छा असते, की माङया झाडावरचा आंबा आधी पिकला पाहिजे. कुठेतरी पटतंय हो, की हे असं पावडर टाकून पिकवणं आंब्यासाठी चांगलं नाही, पण काय करणार? घरच्या घरी, कुटुंबाच्या संस्कारांमध्ये पिकवत बसलो, तर त्याला फारच वेळ लागतो. मग तोर्पयत इतरांकडचे आंबे पटापटा पिकून ‘बाजारात’ येतात; आणि आपला आंबा तसाच? कसं चालायचं हे? शेवटी, ‘कॉम्पिटिशन’मध्ये आपला आंबा मागे पडायला नको. हे सगळं आंब्याच्याच भल्यासाठी आहे. बरं, नुसता पिकवून चालत नाही; तर त्याचं वाणही बघावं लागतं! इथे प्रत्येक झाडाला हापूस आंबेच आले पाहिजेत, हा सगळ्यांचा अट्टाहास आहे. तोही र}ागिरी हापूस. यू.एस.एक्स्पोर्ट क्वॉलिटी! शेवटी इतका आटापिटा करून आंबा पिकवायचा कशासाठी? अमेरिकेत पाठवण्यासाठीच ना! मग देवगड हापूस पण चालणार नाही. र}ागिरी म्हणजे र}ागिरीच. (तो म्हणे पिकत असतानाच अमेरिकन गि:हाईकं उचलून घेतात-प्लेसमेंट का काय म्हणतात म्हणे त्याला.) इकडे कमी पिकणा:या आंब्याला ‘लंगडा आंबा’ म्हणायची पद्धत आहे. आपला आंबा ‘लंगडा’ आहे, हे कुणीच कबूल करायला तयार नसतं. त्यांना तो प्रचंड कमीपणा वाटतो. म्हणजे, ‘लंगडा आंबा’ ही एक स्वतंत्र जात आहे. तिला स्वत:चं असं रंग-रूप आहे. स्वाद आहे. वेगळेपणा आहे.. हे कुणाला मान्यच नाही. तोच कशाला, पण पायरी, केशर, बदाम, तोतापुरी.. कुणाचंच वेगळेपण मान्य नाही. तो ‘हापूस’ नाहीये ना? मग संपलं. त्याच्यात काही अर्थ नाही. आमचं झाड कोणत्याही जातीचं असलं, कलमी असलं- कसंही असलं तरी त्याचा पिकल्यावर हापूसच झाला पाहिजे- नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकलेला हापूस! मग, टाका भरमसाठ पावडर. ती त्या कोवळ्या आंब्याला ङोपतेय की नाही, याची फिकीर नाही. आंबा सडून गेला? चिंता नाही. उचलून फेका टोपली बाहेर. त्याच्या जागी दुसरा आहेच पिकायला तयार. आंब्याचं नशीब, की त्याला बळजबरीने का होईना, पण ‘पिकवतात’. आपल्या देशात कैरीचं नशीब आंब्यांपेक्षाही वाईट आहे. कैरीला तर पिकण्याची संधी मिळेलच, याचीही खात्री नाही. कधी तिला ‘मोहोर’ असतानाच खुडून टाकतात. तर कधी वाढ होण्याआधीच घाईघाईने झाडावरून उतरवतात. आणि संसाराच्या खारात बुडवून लोणच्याच्या बरणीत कैद करून ठेवून देतात. आपण ‘हापूस’ आहोत, का ‘लंगडा’ आहोत, हे पडताळून बघण्याची तिला संधीच मिळत नाही. त्या आधीच तिच्या फोडी झालेल्या असतात. काही लोणच्याच्या खारात बुडतात, तर काही साखरेच्या पाकात बुडून ‘साखरांबा’ म्हणवतात. बरं, पाक साखरेचा-त्यामुळे तक्रार करायची नाही. गुदमरणं मग दोन्हीकडे सारखंच! आणि मुळात तिला पिकायचं होतं की नाही, हे तिला कोणी विचारतच नाही-
- नाही तरी, ‘‘तुझं आता काय करू?’’ असं कैरीला किंवा आंब्याला कधी कुणी विचारतं कां? ते आपणच ठरवणार. आपल्या झाडाचं फळ- त्यावर हक्क आपलाच! हो की नाही?