बेडवरून उठताही येत नाही, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:26+5:302021-07-26T04:15:26+5:30
स्टार ९६८ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घराजवळ केंद्रावर किंवा घरी जाऊन लस देण्याबाबत राज्य ...

बेडवरून उठताही येत नाही, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस
स्टार ९६८
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घराजवळ केंद्रावर किंवा घरी जाऊन लस देण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहे. स्थानिक पातळीवर त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे अशा नागरिकांना एक दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, अनेकांना केंद्रापर्यंत जाणे कठीण होत असल्याने लस घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याने अशा नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी शासनाकडून याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेला पत्र प्राप्त झाले आहे. शिवाय याआधीही दिव्यांग व ज्येष्ठांच्या सोयीच्या लसीकरणासाठी त्यांच्या घराशेजारी किंवा स्वतंत्र सेशन अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर नियोजन केले जात होते. आता याबाबत सूचनाच प्राप्त झाल्या असून याबाबत नव्याने काय करता येईल, याबाबत नियोजन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही ३५ टक्केच ज्येष्ठ नागरिकांचे दोनही डोस घेऊन झालेले आहेत. तर ४० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे उर्वरित ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घेणे प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस ७२१२३९
दुसरा डोस २१४८१३
६० वर्षावरील नागरिक
पहिला डोस : २१२६१०
दुसरा डोस : ७४५५२
हायरिस्कमध्ये कोण?
दिव्यांग, वयोवृद्ध असे नागरिक ज्यांना केंद्रापर्यंत जाणेही अवघड होतेय अशा नागरिकांच्या घराजवळ केंद्र असावे किंवा घरी जाऊन त्यांना लस द्यावी, अशा सूचना राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कोट
मला लस कधी मिळणार?
कोरोनापासून संरक्षण म्हणून सर्वांचेच लसीकरण केले जात आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र व्यवस्था करायला हवी होती. आता नव्या सूचनेनुसार तरी आम्हाला घरी येऊन लस मिळाल्यास आम्ही सुरक्षित राहू.
- नारायण व्यंकट पाटील
ग्रामीण भागात अजूनही भीती
आजारी, ज्येष्ठ नागरिकांमध्ये ग्रामीण भागात अद्यापही लसीकरणाबाबत भीतीचे वातारण आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे लसीकरण झाले आहेत. त्यापैकी ६७ टक्के लसीकरण हे महापालिका क्षेत्रात झाले आहे. ग्रामीण भागात अद्यापही गैरसमज असून लसीकरणामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती लोकांच्या मनात कायम असल्याचे समोर येत आहे.
शासनाकडून सूचना आलेल्या आहेत. आपण आधीही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी स्वतंत्र सेशन घेतले होते. त्यामानाने आपल्या जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा वेग चांगला आहे. आता कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- डॉ. समाधान वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी