सी. सी. आय. ने कापूस खरेदी सुरु करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 17:02 IST2020-11-08T17:02:12+5:302020-11-08T17:02:43+5:30
मागणी : व्यापाऱ्यांकडून कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची लूृट

सी. सी. आय. ने कापूस खरेदी सुरु करावी
हरताळा, ता. मुक्ताईनगर : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुक्ताईनगर, बोदवड येथील सीसीआयची खरेदी दिवाळीपूर्वी सुरू करा तसेच सततच्या पावसाचा आर्थिक फटका बसलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र शासनाने भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. काही शेतकऱ्यांना उभ्या पिकात जनावरे सोडावी लागली. कापूस उत्पादक शेतकर्यांची अडचण गुलाबी बोंड अळीने वाढून कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दराप्रमाणे ५८०० रुपयापर्यंत भाव मिळावा अशी अपेक्षा असताना शेतकऱ्याला आपला माल ४६००ते ४८०० रुपये दराने विकावा लागत आहे . सुमारे एक हजार ते अकराशे रुपयांच्या फरकाने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी विभागाने देखील याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे व शेतकर्यांनी केली आहे.
आता रब्बी हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते , पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. त्यात तोंडवर असलेल्या दिवाळीचा खर्च असल्याने कापूस विकल्या शिवाय पर्याय नाही . मात्र अद्यापही शासकीय कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना हजार ते अकराशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कापूस वेचणी सात ते आठ रुपये किलो मजुरी देऊन करावी लागत आहे . शेतात टाकलेले उत्पन्न घरात कसे येईल या विवंचनेत शेतकरी आहे. असे असून देखील शासनाला मात्र कापूस खरेदीचा अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.