यावल पालिकेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 19:52 IST2018-12-28T19:51:03+5:302018-12-28T19:52:26+5:30
यावल येथील पालिकेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणूक होणार असून, येत्या २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान होणार आहे.

यावल पालिकेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणूक जाहीर
यावल, जि.जळगाव : येथील पालिकेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणूक होणार असून, येत्या २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान होणार आहे.
प्रभाग क्रमांक १ अ चे नगरसेवक शेख बशीर शेख मोहमद मोमीन यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या प्रक्रियेंतर्गत पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर नागरिकांकडून हरकती मागवल्या आल्या होत्या. त्यावर पाच हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यातील एक हरकत फेटाळण्यात आली, तर चार हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत. २९ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल.
३१ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येईल. निवडणुकीचा कार्यक्रम प्राप्त झाला असल्याचे येथील पालिकेचे निवडणूक कर्मचारी रमाकांत मोरे यांनी सांगितले. २७ जानेवारी २०१९ रोजी येथील मतदान होणार आहे. त्यासाठी २ ते ९ जानेवारी २०१९ या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची १० जानेवारी २०१९ रोजी छाननी होईल. मतदान २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ७.३० ते ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.