बसस्थानक झाले खड्ड्यातले चिखल स्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:40+5:302021-08-22T04:18:40+5:30
पारोळा : तालुक्यातील बसस्थानक अक्षरश: खड्ड्यांच्या गराड्यात अडकलेले आहे. या खड्ड्यांच्या गराड्यात संपूर्ण चिखलमय होऊन बसगाड्यांसह प्रवाशांनादेखील येण्या-जाण्यासाठी अडथळा ...

बसस्थानक झाले खड्ड्यातले चिखल स्थानक
पारोळा : तालुक्यातील बसस्थानक अक्षरश: खड्ड्यांच्या गराड्यात अडकलेले आहे. या खड्ड्यांच्या गराड्यात संपूर्ण चिखलमय होऊन बसगाड्यांसह प्रवाशांनादेखील येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
बारा वर्षांपूर्वी पारोळा बसस्थानक हे मॉडेल बसस्थानक म्हणून बांधण्यात आले होते. ठक्कर बाजार अंतर्गत या बसस्थानकाची सुंदर अशी निर्मिती करण्यात आली होती; परंतु जसजसे दिवस जात गेले, तसतसे या बसस्थानकाची दुर्दशा होत गेली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मचा परिसर गेल्या बारा वर्षांपासून एकदाही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यावर मात्र प्रवाशांनी प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त केली.
बसस्थानकात खड्डे पडल्यानंतर मुरमाच्या साहाय्याने बुजविले जातात, परंतु हे फक्त काही दिवसांपुरतेच चांगले असतात. त्यानंतर परिसरात ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. पावसामुळे प्रचंड प्रमाणात चिखल होतो. हा चिखल तुडवून प्रवाशांना बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे. तसेच बसमध्ये चढण्यासाठीदेखील चिखलातून प्रवेश करावा लागतो. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. सध्या रक्षाबंधन व विविध सण, उत्सव असल्याने बसस्थानकात चांगलीच गर्दी आहे.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष
बारा वर्षांपासून बसस्थानकात एकदाही डांबरीकरण न झाल्याने या बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे किती दुर्लक्ष झाले आहे, हे दिसून येते. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बसस्थानकात अशी अवस्था असेल तर इतर गावांच्या रस्त्यांची व बसस्थानकांची अवस्था कशी असेल? हेच यावरून दिसते म्हणून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दीड ते दोन फूट एवढे खड्डे
पारोळा बसस्थानकात प्रवेशद्वाराजवळ व क्यू भागात किमान दीड ते दोन फूट एवढे मोठमोठे खड्डे असल्याने बसचालकांना अक्षरशः खड्ड्यांचा अंदाज बांधून गाडी चालवावी लागत आहे. थोडा अंदाज चुकला तर बसचे बंपर हे जमिनीला टेकले जाऊन बसचे नुकसान होत आहे.
210821\21jal_1_21082021_12.jpg
छायाचित्र राकेश शिंदे