घरफोडीच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच पुन्हा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:30+5:302021-09-07T04:22:30+5:30
जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच विशाल मुरलीधर दाभाडे (रा.रामेश्वर कॉलनी) याने पुन्हा दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन रामेश्वर कॉलनीत ...

घरफोडीच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच पुन्हा घरफोडी
जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच विशाल मुरलीधर दाभाडे (रा.रामेश्वर कॉलनी) याने पुन्हा दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन रामेश्वर कॉलनीत किराणा दुकानात फोडून त्यातील दागिने व रोकड असा अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर २४ तासाच्या आत एमआयडीसी पोलिसांनी दाभाडेसह त्याचे साथीदार योगेश उर्फ पत्ता राजेंद्र चौधरी व विकास उर्फ विक्की नारायण खोडके या तिघांना सोमवारी पहूरच्या जंगलातून पकडण्यात आले.
रामेश्वर कॉलनीतील तुळजामाता नगरात सुरेश तानाजी पाटील यांच्या मालकीचे सुनंदा किराणा स्टोअर्स हे दुकान फोडून २ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली असता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कुठेच नसल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी विशाल दाभाडे व त्याच्यासोबत दोन जण याच दुकानाच्या परिसरात वारंवार फिरत असल्याची माहिती शिकारे यांना समजली. त्याची माहिती काढली असता तो गायब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणखी संशय बळावला. गुप्त माहितीच्या आधारावर सहायक फौजदार अतुल वंजारी, मुकेश पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील व सचिन पाटील यांनी थेट पहूर गाठले. तेथे तिघं जण एकाच ठिकाणी मिळून आले. चौकशीत त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, विशाल हा अट्टल गुन्हेगार असून रामानंद नगर व एमआयडीसी असे १० गुन्हे दाखल आहेत. २ सप्टेबर रोजी विशाल याने रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगरात घरफोडी केली होती, त्यात जामीन होताच पाटील यांचे किराणा दुकान फोडले.