भुसावळात भरधाव डंपरच्या धडकेत बुलढाण्याचे दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:59 IST2020-12-04T21:57:53+5:302020-12-04T21:59:12+5:30
चालकास अटक

भुसावळात भरधाव डंपरच्या धडकेत बुलढाण्याचे दाम्पत्य ठार
भुसावळ : लग्नासाठी भुसावळात आलेल्या बुलढाण्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने कट मारल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला . ही घटना शुक्रवार रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास खडका चौफुलीवर घडली. यासंदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती अशी की, चंद्रकांत जगन्नाथ वराडे (६३ ), संध्या चंद्रकांत वराडे( ५६ ) दोन्ही रा. चिखली रोड , बुलढाणा हे भुसावळ येथील गडकरी नगरात नातेवाईकांकडे लग्नसमारंभासाठी आले होते. गुरुवार रोजी त्यांनी देना नगरातील नातेवाइकांकडे मुक्काम केला. त्यानंतर सकाळी वराडे हे मोटरसायकलवर (एम. एच. २८ - ६६७१) या मोटरसायकलने खडकारोडने गडकरी नगरकडे जाण्यासाठी निघाले होते. खडका चौफुली जवळ येताच डंपरचा ( एम . एच. १९ झेड - ३१९२) त्यांच्या मोटर सायकलला कट लागला . त्यामुळे दुचाकी एकदम घसरली. या अपघातात पती व पत्नी हे डंपरच्या मागील चाकाखाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत , सचिन पोळ ,, संजय भदाणे, कृष्णा देशमुख , रमण सुरडकर , भालेराव यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात णे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालक महेंद्र ब्रिजलाल कोळी रा. भोरटेक ता. यावल यास अटक करण्यात आली आहे.