केबल तुटल्याने बीएसएनएलची चार तास ‘कनेक्टिव्हिटी’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST2021-04-27T04:17:39+5:302021-04-27T04:17:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तीन दिवसांपूर्वी केबल तुटल्यामुळे तीन तास बीएसएनएलची सेवा खंडित झाल्याचा प्रकार घडल्यानंतर, सोमवारी पुन्हा ...

केबल तुटल्याने बीएसएनएलची चार तास ‘कनेक्टिव्हिटी’ बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तीन दिवसांपूर्वी केबल तुटल्यामुळे तीन तास बीएसएनएलची सेवा खंडित झाल्याचा प्रकार घडल्यानंतर, सोमवारी पुन्हा केबल तुटल्याने चार तास बीएसएनएलची सेवा खंडित होती. यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. आठवडाभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने ग्राहकांमधून बीएसएनएलच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव बीएसएनएल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बीएसएनएलच्या धुळे व औरंगाबाद क्षेत्रात रस्त्याच्या कामामुळे केबल तुटल्या. जळगाव विभागात कोठेही केबल तुटल्या नव्हत्या. बीएसएनएलची सर्वत्र कनेक्टिव्हिटी एकच असल्यामुळे याचा जळगाव जिल्ह्यातील सेवेवर याचा परिणाम झाला. केबल तुटल्याने धुळे व औरंगाबाद जिल्ह्यातही बीएसएनएलच्या ग्राहकांची घरगुती व मोबाईल सेवा खंडित झाली होती. साधारणतः दुपारी दोनपासून सायंकाळी सहापर्यंत ही सेवा खंडित होती. रस्त्याचे काम झाल्यानंतर त्या-त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर सर्वत्र टप्प्या-टप्प्याने बीएसएनएलची सेवा पूर्ववत झाल्याचेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
लाखो नागरिकांची कामे खोळंबली
तीन दिवसांपूर्वी बीएसएनएलची सेवा खंडित असल्यामुळे घरगुतीपेक्षा बीएसएनएलचे सीमकार्ड असलेल्या मोबाईलधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर सोमवारी पुन्हा चार तास सेवा खंडित झाल्याने याचा नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. सध्या कोरोना काळात बहुतांश नोकरदार वर्गाची कामे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा व इंटरनेटचा वापर वाढला आहे. मिटिंग, बैठका व इतर सर्व कामकाज मोबाईलवरच सुरू आहे. असे असताना सोमवारी तब्बल चार तास सेवा खंडित झाल्याने बीएसएनएलच्या लाखो ग्राहकांची कामे खोळंबली. याबाबत अनेक नागरिकांनी जळगाव बीएसएनएल विभागाकडे तक्रारी केल्या.
इन्फो :
सोमवारी बीएसएनएल धुळे व औरंगाबाद क्षेत्रात रस्त्याच्या कामामुळे केबल तुटल्या होत्या.
यामुळे बीएसएनएलची तीन ते चार तास सेवा खंडित होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने कामे हाती घेऊन सायंकाळी ही सेवा सर्वत्र पूर्ववत सुरू झाली.
संजय केशरवाणी, महाव्यवस्थापक, बीएसएनएल जळगाव विभाग