खान्देशात बीएसएनएल २३२ नविन मोबाईल टॉवर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 18:44 IST2023-10-01T18:43:52+5:302023-10-01T18:44:54+5:30
बीएसएनएलच्या वर्धापन दिनानिमित्त विविध योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

खान्देशात बीएसएनएल २३२ नविन मोबाईल टॉवर उभारणार
भूषण श्रीखंडे, जळगाव : बीएसएनएलच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने जळगाव बीएसएनएल कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तीन महसुली जिल्ह्यात २०२४ पर्यंत २३२ पैकी ८७ मोबाईल टॉवर जळगाव जिल्ह्यात बसविले जाणार असल्याची माहिती जळगाव बी झोन महाप्रबंधक महेश कुमार यांनी दिली.
बीएसएनएलच्या वर्धापन दिनानिमित्त विविध योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी उपमहाप्रबंधक जे.पी. दामले, सहाय्यक महाप्रबंधक डी. आर. रायते उपस्थित होते. महाप्रबंधक महेश कुमार म्हणाले, की आजच्या स्थितीला हायस्पीड ४ जी इंटरनेट सेवा नसलेली जळगाव जिल्ह्यातील ९० गावे, धुळे जिल्ह्यातील ४७ व नंदुरबार जिल्ह्यातील ७२ गावांमध्ये सेवा नसल्याची माहिती समोर आली आहे. या गावांमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. याकरीता प्रकल्प जळगाव बीएसएनएल व्यवसाय क्षेत्रासाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन महसुली जिल्ह्यांमध्ये मार्च २०२४ पर्यंत एकूण २३२ मोबाईल टॉवर फोर-जी सेवा नसलेल्या गावांमध्ये उभारले जाणार आहेत.
बेरोजगारांना संधी
बेरोजगार तरुणांना शहरी आणि ग्रामीण भागात बीएसएनएल एफटीटीएच कनेक्शन देण्यासाठी बीएसएनएलमार्फत काम करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या तीन महिन्यांसाठी टीआयपी नोंदणी रक्कम ११ हजारावरून २ हजार रूपयांपर्यंत शिथिल केली आहे. यासाठी १२ पास किंवा अधिक शिकलेला व्यक्ती बीएसएनएल सोबत त्याचा व्यवसाय करू शकतो अशी माहिती प्रबंधक कुमार यांनी दिली.