भाऊ, कोरोनामुळे राज्य सरकार कंगाल झाले आहे, आता बसपोर्ट होणार नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST2021-07-10T04:12:57+5:302021-07-10T04:12:57+5:30
जळगाव : राज्यात युतीचे सरकार असताना, तेव्हाचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील १० आगारांमध्ये बसपोर्ट उभारण्याची घोषणा केली होती. ...

भाऊ, कोरोनामुळे राज्य सरकार कंगाल झाले आहे, आता बसपोर्ट होणार नाही...
जळगाव : राज्यात युतीचे सरकार असताना, तेव्हाचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील १० आगारांमध्ये बसपोर्ट उभारण्याची घोषणा केली होती. यामध्ये जळगाव आगाराचाही समावेश होता. बसपोर्टमुळे जळगाव आगाराचा कायापालट होणार होता. सिनेमागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, वाहनतळ, आरामदायी बैठक व्यवस्था आदी विविध सुविधांमुळे सर्व एसटी कर्मचाऱ्यांमध्ये बसपोर्टचे मोठे आकर्षण निर्माण झाले होते. मात्र, तीन वर्षे उलटूनही बसपोर्टचा प्रश्न मार्गी न लागल्याने, आता जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये या बसपोर्टबद्दल विविध प्रकारच्या रंजक चर्चा सुरू झाल्या आहेत.
तीन दिवसांपूर्वी नवीन बस स्थानकात दैनिक ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात आगारातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आगारातीलच दोन वाहक एकमेकांशी गप्पा मारत असताना, एकाने बसपोर्टविषयी चर्चा करायला सुरुवात केली. आपल्या आगारात बसपोर्ट मंजूर झाले आहे, त्याचे काय झाले. बसपोर्ट होणार आहे का, काम कधी सुरू होणार, असे एक ना अनेक प्रश्न हा वाहक दुसऱ्या वाहकाला विचारत होता. यावेळी ‘त्या’ वाहकाने कोरोनामुळे राज्य सरकारची परिस्थिती यंदा अधिकच खराब झाली आहे. कोरोनामुळे सरकारने मोठ्या प्रमाणावर कर्ज काढल्यामुळे, राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. आधीच्या युती सरकारवरही कर्ज होते आणि आता महाविकास आघाडी सरकारवरही कर्जाचा डोंगर झाला आहे. त्यामुळे भाऊ, कोरोनामुळे राज्य सरकार अधिकच कंगाल झाले आहे, त्यामुळे आता बसपोर्ट होणार नाही, असे या वाहकाने संबंधित वाहकाला सांगितले. या दोघा वाहकांची बसपोर्टवर सुरू असलेली गहन चर्चा ऐकण्यासाठी इतर वाहकही या ठिकाणी एकत्र यायला सुरुवात झाली होती.