भाऊ दवाखान्यात, आई कामावर असताना तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST2021-09-02T04:33:51+5:302021-09-02T04:33:51+5:30

जळगाव : आई कामावर गेलेली तर लहान भाऊ दवाखान्यात दाखल असताना समाधान आत्माराम पाटील (वय ३५) या तरुणाने ...

Brother commits suicide at hospital, youth commits suicide while mother is at work | भाऊ दवाखान्यात, आई कामावर असताना तरुणाची आत्महत्या

भाऊ दवाखान्यात, आई कामावर असताना तरुणाची आत्महत्या

जळगाव : आई कामावर गेलेली तर लहान भाऊ दवाखान्यात दाखल असताना समाधान आत्माराम पाटील (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कुसुंबा, ता.जळगाव येथे घडली. समाधान हा दोन दिवसांपासून तणावात होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान पाटील हा बोदर्डे ता. पारोळा येथील मूळ रहिवासी होता. गेल्या १५ वर्षांपासून तो आई व भावासोबत कुसुंबा येथे राहत होता. वडिलांचे निधन झालेले आहे. एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या दीड वर्षापासून पत्नी व मुलगा माहेरी निघून गेलेले आहेत. त्यामुळेदेखील तो तणावात होता. मंगळवारी सकाळीच त्याचा लहान भाऊ जितेंद्र याला ताप असल्याने जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आई कामावर निघून गेलेली होती. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. सायंकाळी पाच वाजता आई घरी आली असता समाधान याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलीस पाटील राधेश्याम चौधरी, विलास कोळी व भूषण पाटील यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधानच्या पश्चात आई सुनंदाबाई, भाऊ जितेंद्र, पत्नी, मुलगा समर्थ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

Web Title: Brother commits suicide at hospital, youth commits suicide while mother is at work