नागपूरच्या ‘त्या’ नववधूची सबजेलमध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 20:39 IST2019-09-29T20:39:14+5:302019-09-29T20:39:18+5:30
धरणगाव : तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी लग्न करुन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आचल अजय देशमुख रा.नागपूर हिच्यावर गुन्हा दाखल ...

नागपूरच्या ‘त्या’ नववधूची सबजेलमध्ये रवानगी
धरणगाव : तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी लग्न करुन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आचल अजय देशमुख रा.नागपूर हिच्यावर गुन्हा दाखल झाला. धरणगाव पोलिसांनी तिला २९ रोजी येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज नामंजूर करुन सबजेलला रवानगी केली आहे.
दरम्यान, पोलीसांनी तिच्यावर फसवणुकीची कलम वाढवली असून तपासात आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
या घटनेबाबत रवींद्र सुरेश पाटील रा.बोरगाव याने दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणूक केल्याप्रकरणी आचल अजय देशमुख (रा.वार्ड क्र. ३, लता मंगेशकर रोड, भीमनगर, नागपूर हिच्या विरुध्द गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले होते. तपास अधिकारी सपोनि पवन देसले यांनी कलम ४२० वाढवून तिला धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस.डी.सावरकर यांनी तिचा जामीन अर्ज नामंजूर केला. त्यामुळे तिची रवानगी सबजेलला करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी लग्नासाठी मध्यस्थी करणाºया आचलच्या नातेवाईकांचा शोध घेणे घेणे सुरु केले असून, त्यांनी अशा किती जणांना फसविले आहे, याची शहानिशा केली जात आहे. त्यामुळे तपासात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे सपोनि देसले यांनी सांगितले. दरम्यान, बोरगावचे ग्रामस्थ आजही उत्सुकतेने न्यायालयात थांबून होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपींचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जना भगवान पाटील, पप्पू पाटील, माजी सरपंच भालचंद्र मुन्ना पाटील, यांनी केली आहे.