मुलगा किराणा घेण्यास गेला अन् आईचा झाला घात, भुसावळातील घटनेने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:32 IST2021-06-03T04:13:46+5:302021-06-03T12:32:11+5:30
सासू-सुनेत झालेल्या वादाचे रूपांतर विकोपाला जाऊन, सुनेने आपल्या सासूच्या मानेवर विळ्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गजानन महाराज नगर भागातील कोटेचा माध्यमिक विद्यालयात सायंकाळी पावणेसातला घडली.

मुलगा किराणा घेण्यास गेला अन् आईचा झाला घात, भुसावळातील घटनेने खळबळ
भुसावळ : सासू-सुनेत झालेल्या वादाचे रूपांतर विकोपाला जाऊन, सुनेने आपल्या सासूच्या मानेवर विळ्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गजानन महाराज नगर भागातील कोटेचा माध्यमिक विद्यालयात सायंकाळी पावणेसातला घडली. मुलगा किराणा घेण्यास गेला, अन् आईचा घात झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील गजानन महाराज नगर भागातील पद्माबाई कोटेचा प्राथमिक व बालवाडी विद्यामंदिर आणि माध्यमिक विद्यालयात आठ वर्षांपासून वॉचमनची नोकरी करणाऱ्या रवींद्र सोनवणे हे आपल्या परिवारासह शाळेतीलच पत्र्याच्या खोलीत रहिवासाला आहेत. त्यांच्यासोबत पत्नी उज्ज्वला रवींद्र सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे या राहत होत्या.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रवींद्र सोनवणे हा किराणा दुकानावर माल खरेदी करण्यासाठी गेला. त्यादरम्यान रवींद्र सोनवणे यांची पत्नी उज्ज्वला सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यात वाद झाला, तो विकोपास जाऊन उज्ज्वला सोनवणे यांनी धारदार विळ्याने द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून ठार मारल्याची घटना सायंकाळी ६.४० वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गणापुरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती.