नियोजित वधू व सासूला सोडून परत येत असताना कार अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:44+5:302021-07-09T04:11:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव/ नशिराबाद : होणाऱ्या पत्नी व सासूला सोडून परत जाताना भरधाव कार पलटी होऊन ठाणे ...

Both were killed in a car accident while returning from a planned wedding | नियोजित वधू व सासूला सोडून परत येत असताना कार अपघातात दोघे ठार

नियोजित वधू व सासूला सोडून परत येत असताना कार अपघातात दोघे ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव/ नशिराबाद : होणाऱ्या पत्नी व सासूला सोडून परत जाताना भरधाव कार पलटी होऊन ठाणे जिल्ह्यातील अभिजित सुभाष पसारे (वय ३०, रा. डोंबिवली) व पवन नंदू बागुल (वय २८, रा. मानपाडा) हे दोघे तरुण ठार झाले. नशिराबादनजीक महामार्गावर सरस्वती फोर्डजवळ गुरुवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार दुभाजकावर धडकून पाच वेळा पलटी झाल्याने दोघांचा त्यात जीव गेला.

अभिजित पसारे याचे साकेगाव, ता. भुसावळ येथील तरुणीशी लग्न ठरले होते. साखरपुडाही झालेला आहे. या तरुणीच्या वडिलांना कर्करोगाचा आजार असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यांना तेथे दाखल करून अभिजित हा होणारी पत्नी व सासू या दोघांना सोडण्यासाठी कारने आला होता. सोबत पवन बागूल हा तरुणही होता. पवनचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेले आहे. त्याची सासुरवाडी मालेगाव येथील आहे. पत्नी दोन दिवसांपूर्वीच मालेगावला आलेली आहे. अभिजितच्या होणारी पत्नी व सासूला सोडल्यानंतर परत जाताना मालेगाव येथून पवनच्या पत्नीला घेऊन जाण्याचे त्यांनी नियोजन केले होते. त्यानुसार बुधवारी रात्री दोघे जण कारने मालेगावच्या दिशेने निघाले असता नशिराबाद सोडल्यानंतर सरस्वती फोर्ड या शोरूमसमोर कार दुभाजकावर आदळली व त्यात पाच वेळा पलटी झाली. अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार चालविणारा अभिजित जागेवरच गतप्राण झाला होता, तर पवन याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

कागदपत्रांवरून पटली ओळख

अपघातातील दोघे तरुण अनोळखी होते. त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. पवनच्या खिशात औषधींचे बिल होते तर अभिजितच्या खिशात आधार व पॅन कार्ड होते. घटना घडल्यानंतर साकेगावचेही काही नागरिक घटनास्थळी आले होते. अभिजित याचे मामा चंद्रकांत पांडुरंग जोशी हे खेडी येथील रहिवासी असल्याने नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला तर पवनचेही नातेवाईक खडकदेवळा, ता. पाचोरा येथे आहेत. दोघांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय गाठल्यावर त्यांची ओळख पटली. दरम्यान, पवन व अभिजित दोघंही मित्र असून खासगी कंपनीत कामाला असल्याचे सांगण्यात आले.

तरुणीचा प्रचंड आक्रोश

घटनेत होणारा पती ठार झाल्याचे समजताच तरुणीने आईला सोबत घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले. शवविच्छेदनगृहात जाऊन तिने अंतिम दर्शन घेतले. यावेळी तिचा प्रचंड आक्रोश सुरू होता. लग्नाआधीच होणारा पती ठार झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

रस्त्याने केला घात

महामार्गाचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी रस्ता पूर्ण झाला आहे तर काही ठिकाणी अपूर्ण आहे. कार भरधाव वेगाने येत असताना अचानक कच्चा रस्ता लागला व त्यात गती कमी करणे शक्य न झाल्याने चालकाचा तोल सुटला. ठिकठिकाणी ठिगळ लागलेले आहेत, तेथे सूचना फलक वगैरे काहीच नसल्याने रस्त्यानेच या तरुणांचा घात केल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Both were killed in a car accident while returning from a planned wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.