शहरात विनापरवाना ३५ नागरिक वापरताहेत बोअरवेलचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:53+5:302021-07-15T04:12:53+5:30
वाढीव भागात घरासोबत एक बोअरवेल : भविष्यात भूजल पातळीत होणार मोठी घट ०२ दिवसाआड शहरात पाणीपुरवठा ०५ हजारहून अधिक ...

शहरात विनापरवाना ३५ नागरिक वापरताहेत बोअरवेलचे पाणी
वाढीव भागात घरासोबत एक बोअरवेल : भविष्यात भूजल पातळीत होणार मोठी घट
०२
दिवसाआड शहरात पाणीपुरवठा
०५
हजारहून अधिक बोअरवेल
६ लाख
शहराची लोकसंख्या
७१ हजार
नळांद्वारे केला जातो पाणीपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील
जळगाव - शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्याने जळगावकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत नसले तरी दोन वर्षांपूर्वी शहरात पाऊस न झाल्यामुळे वाघूर धरणातील जलसाठ्यात मोठी घट होऊन, शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. असे असतानाही जळगावकरांना पाण्याचे महत्त्व समजलेले दिसून येत नाही. कारण शहरात ३५ टक्के नागरिक मनपा प्रशासन किंवा भूजल सर्वेक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बोअरवेलचे पाणी वापरत आहेत, तसेच नवीन बोअरवेल तयार करण्याचे काम सुरूच असून, यामुळे भविष्यात शहराच्या भूजल पातळीत मोठी घट होण्याची शक्यता आहे.
शहरातील नीर फाउंडेशनतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. शहरात काही भागांत ५० ते ६० फुटांवर पाणी लागत आहे. काही भागांत ९० फुटांपर्यंत पाण्याची पातळी खाली गेली आहे, तसेच शहरात बेसुमार पद्धतीने बोअरवेल घेण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी महापालिकेचे नळ कनेक्शन आहे अशा घरांमध्येदेखील बोअरवेल घेण्यात आले आहेत.
मनपा, मजीप्राने झटकले हात
शहरात होणाऱ्या बोअरबेलबाबत कोणत्याही विभागाची परवानगीदेखील घेतली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय नियमानुसार २०० फुटांपेक्षा अधिक खोलीपर्यंत बोअरवेल घेऊ नये अशा सूचना आहेत. मात्र, याची साधी तपासणीदेखील केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे, तसेच महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडूनदेखील याबाबत लक्ष दिले जात नसल्याने कोणीही यावे आणि बोअरवेल घ्यावे, अशीच स्थिती सध्या जळगाव शहरात निर्माण झाली आहे.
याठिकाणी जातेय पाणी वाया
शहरातील नागरिक पाण्याचा वापर गांभीर्याने करीत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील झोपडपट्टी भागात नळांना तोट्या बसविण्यात आल्या नसल्याने नळ आल्यावर भरमसाठ पाणी वाया जाते. शहरात मनपाकडून होत असलेल्या पाणीपुरवठ्यांतर्गत मोठ्या प्रमाणात गळती आहे. मात्र, या गळती वेळेवर दुरुस्त केल्या जात नसल्याने या गळत्तींद्वारेदेखील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
शहरातील वाढीव भागात सर्वाधिक बोअरवेल
१.शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत असून, वाढीव भागात मनपाकडून अद्यापही पाणीपुरवठा केला जात नाही. शहरातील ७० टक्के बोअरवेल हे या वाढीव भागातच आहेत.
२. वाघनगर, राजारामनगर, चंदू अण्णानगर, निमखेडी परिसर, आहुजानगर, खेडी परिसर, रामेश्वर कॉलनी परिसर, पिंप्राळा परिसर, वाटीकाश्रम परिसर, केसी पार्क, महादेवनगर, सत्यम पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदण्यात आले आहेत.
नीर फाउंडेशनचा सर्व्हे काय म्हणतो
शहरातील नीर फाउंडेशनतर्फे शहरातील पाण्याचा वापराबाबत काही महिन्यांपूर्वी सर्व्हे करण्यात आला होता. त्याद्वारे शहरातील पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सरकारी संस्था पुरेशी कामे करीत नसल्याचे ७७ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे, तसेच शहरातील नागरिकांची गरज भागविण्यासाठी जळगाव शहरात पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचे ७६ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे, तसेच जलसंवर्धनासाठी नवीन कायद्याची निर्मिती व्हावी असेही शहरातील ९६ टक्के नागरिकांना वाटते, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. दरम्यान, या सर्वेक्षणादरम्यान शहरातील १ हजार २०० नागरिकांशी चर्चा करण्यात आली.
कोट...
जलपुनर्भरण नावालाच
शहरात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे, तसेच शहरात ज्याप्रमाणे एका घरामागे एक बोअरवेलची संख्या वाढत आहे. ही बाब भविष्याचा दृष्टीने धोकादायक असून, यावर प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज आहे.
-सागर महाजन, नीर फाउंडेशन
वाया जाणाऱ्या पाण्याचे संवर्धन करण्याबाबत जळगाव शहरात कोणतेही काम सुरू नाही. प्रशासन तर या प्रक्रियेत फारच उदासीन असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सातपुड्यासारख्या दुर्गम भागात जलसंवर्धनाचे काम सुरू असताना, सुशिक्षित झालेल्या समाजात मात्र याबाबत दुर्लक्ष होत आहे.
-प्रणीलसिंह चौधरी, योगी फाउंडेशन