न्यायाधीशांनी पंचनामा केल्यानंतरच घेतला मृतदेह ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:58+5:302021-07-29T04:16:58+5:30
कारागृह प्रशासनाने वेळीच बंद्याला रुग्णालयात दाखल केले नाही, म्हणून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. कारागृह प्रशासनाने मात्र ...

न्यायाधीशांनी पंचनामा केल्यानंतरच घेतला मृतदेह ताब्यात
कारागृह प्रशासनाने वेळीच बंद्याला रुग्णालयात दाखल केले नाही, म्हणून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. कारागृह प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान, वेळेवर उपचार मिळत नसल्याने बुधवारी कारागृहातील बंद्यांनी अन्नत्याग करून उपोषणही केले.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन याची २० जुलै रोजी कारागृहात प्रकृती बिघडली होती. त्यादिवशी त्याला डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले. तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी त्याची प्रकृती खालावली, त्यामुळे २३ रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभर वेगवेगळ्या चाचणी कराव्या लागल्यामुळे त्याच्यावर कोणतेच उपचार झाले नाहीत. रात्री ९ वाजता चाचण्यांचे अहवाल आल्यावर त्याला डायबेटीस जास्त असल्याचे निदान झाले. तेव्हाच्या तेव्हा त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. बुधवारी पहाटे २ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. सर्वात आधी जेव्हा त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले होते तेव्हाच दाखल करून घेतले असते तर वेळेवर उपचार होऊन त्याचा जीव वाचला असता, मात्र कारागृह प्रशासनाने त्याकडे हलगर्जीपणा केल्याचा आरोप पवनचे मामा श्याम महाजन यांनी केला आहे.
रुग्णालयात तणाव, पोलिसांचा फौजफाटा तैनात
पवन याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. कारागृह प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. वातावरण तापल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी पवनच्या नातेवाइकांची समजूत घातली. न्यायालयीन बंद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याची न्यायालयीन चौकशी होते. मृत्यूचे कारणही शवविच्छेदन अहवाल स्पष्ट होईल, असे सांगून कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले.
तीन वर्षांपासून कारागृहात
एरंडोल येथील उमेश खंडू पाटील यांच्या खून प्रकरणात पवन महाजन हा १७ सप्टेबर २०१८ पासून कारागृहात होता. ६ सप्टेबर २०१८ रोजी खुनाची घटना घडली होती. त्यात मामा दशरथ महाजन, पंकज नेरकर, पवन महाजन, भरत महाजन व राहुल महाजन असे संशयित आरोपी आहेत. सर्व जण कारागृहात आहेत. हा खटला अंडरट्रायल सुरू आहे. पवन हा अविवाहित होता. त्याला डायबेटीसचा आजार होता, मात्र आजार नियंत्रणात होता, असे मामा श्याम महाजन यांनी सांगितले.
बंद्यांचे कारागृहात उपोषण
कारागृहात प्रकृती बिघडल्यानंतर लवकर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याची तक्रार पवनसोबत कारागृहात असलेले मामा दशरथ महाजन यांनी पत्रकारांकडे केली. वेळेवर उपचार मिळत नाही, त्याचा पवन बळी ठरला आहे म्हणून आज बंद्यांनी अन्नत्याग करून कारागृहातच उपोषण सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले. दशरथ महाजन यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात आणले असता तेव्हा त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
कोट...
पवन याला रुग्णालयात दाखल करण्याबाबत कारागृह प्रशासनाने दिरंगाई केली आहे. पहिल्या वेळी तपासणीसाठी नेले तेव्हाच त्याला दाखल केले असते तर आज त्याचा जीव गेला नसता. त्याच्या मृत्यूला कारागृह प्रशासनच जबाबदार आहे. याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी.
-श्याम महाजन, मयत पवनचे मामा
कोट...
पवनची प्रकृती बिघडली तेव्हापासून तो रुग्णालयात उपचार घेत होता. आठ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. यात प्रशासनाने कुठेही दिरंगाई केलेली नाही. बंद्याच्या उपोषणाबाबत त्यांची समजूत घातली आहे. आता त्यांनी जेवण घेतले. नातेवाइकांच्या आरोपात तथ्य नाही.
-अनिल वांढेकर, अधीक्षक, जिल्हा कारागृह