मोहाडी शिवारातील विहिरीत आढळला बिबट्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:19+5:302021-07-24T04:12:19+5:30

सहा महिन्यातील चौथी घटना : मदत न मिळाल्याने पाण्यात बूडून मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जामनेर तालुक्यातील मोहाडी ...

The body of a leopard was found in a well in Mohadi Shivara | मोहाडी शिवारातील विहिरीत आढळला बिबट्याचा मृतदेह

मोहाडी शिवारातील विहिरीत आढळला बिबट्याचा मृतदेह

सहा महिन्यातील चौथी घटना : मदत न मिळाल्याने पाण्यात बूडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील मोरगाव तांडा परिसरातील एका शेतातील विहिरीत शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. बिबट्याचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी बुडून झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव वनक्षेत्रात गेल्या सहा महिन्यातील बिबट्याच्या मृत्यूची ही चौथी घटना आहे. वनविभागाकडून बिबट्याचे शवविच्छेदन करुन, व्हिसेरा तपासण्यासाठी नाशिकला रवाना करण्यात आला आहे.

जळगाव रेंजमधील जामनेर तालुक्यातील मोहाडी भागातील मोरगाव तांडा परिसरात शुक्रवारी सकाळी ८ वाजता मोहाडी येथील शेतकरी राजेंद्र भदाणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह आढळून आला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिसरात पाऊस सुरु असल्याने शेतातील कामे थांबली आहेत. त्यामुळे शेतकरी फारसे शेतात जात नाहीत. राजेंद्र भदाणे हे शुक्रवारी आपल्या शेतात पीकांची पाहणी करायला गेले असताना, त्यांना विहिरीत बिबट्याचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याबाबत ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी देखील याबाबत वनविभागाला या घटनेची माहिती दिली.

मृत्यूचे कारण

१. मोहाडी, जळके-विटनेर शिवारात बिबट्यांची संख्या चांगली आहे. अनेकवेळा शिकारीच्या शोधात बिबटे शेतापर्यंत येत असतात. हा बिबट्या देखील शिकारीच्या मागे धावत असताना या विहिरीत पडला असल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

२. विहिरीला कोणताही कठडा नसल्याने हा बिबट्या थेट विहिरीत जावून पडला. त्यातच बाहेर येण्यासाठी जागा न मिळाल्याने बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

३. बिबट्याचा मृतदेह कुजलेला अवस्थेत असून, बिबट्याची कातडी देखील पुर्णपणे निघून गेली आहे. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू चार ते पाच दिवसांपुर्वी झाल्याची शंका वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या सहा महिन्यातील बिबट्यांचे झालेले मृत्यू व कारण

डिसेंबर २०२० - जळके शिवार - विषबाधा

जानेवारी २०२१ - ममुराबाद - विषबाधा

जुलै २०२१ - विटनेर शिवार - विषबाधा

२३ जुलै - मोहाडी - विहरीत बूडून

कोट...

बिबट्याचा मृत्यू हा विहरीत बुडाल्याने झाला आहे. शिकारीच्या मागे लागत असताना बिबट्या या विहिरीत कोसळला असावा. सध्या शेतकरी देखील पावसाचे वातावरण असल्यामुळे शेतात जात नाही. त्यामुळे चार ते पाच दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

-समाधान पाटील, वन अधिकारी, जळगाव विभाग

Web Title: The body of a leopard was found in a well in Mohadi Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.