मुले जिवंत होण्याच्या आशेने जळगावात मृतदेह ठेवले मिठात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:42 PM2019-08-17T12:42:02+5:302019-08-17T12:42:32+5:30

फिरायला आलेल्या दोन भावंडांचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू

The bodies were kept in salt | मुले जिवंत होण्याच्या आशेने जळगावात मृतदेह ठेवले मिठात

मुले जिवंत होण्याच्या आशेने जळगावात मृतदेह ठेवले मिठात

Next

जळगाव : शहरातील मेहरुण तलावाजवळ फिरण्यासाठी गेलेल्या तीन भावांपैकी दोघा भावंडाचा बुडून मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली़ तर त्यांचा तिसरा भाऊ अनस मात्र बचावला. मोहम्मद उमेर जकी अहमद (वय-१२) व अबुलैस जकी अहमद (वय १६) अशीे मयत बालकांची नावे आहेत़ मात्र बुडालेल्या व्यक्तीचे मृतदेह मिठात बुडवून ठेवल्यास ती व्यक्ती जिवंत होते, असा सोशल मिडियावरील मेसेज वाचून या बालकांचे मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवगृहातच मिठात बुडवून ठेवण्याचा खळबळजनक प्रकार घडला.
शहरातील मेहरुण परिसरातील अक्सा नगरातील अल अजीज अपार्टमेंटमध्ये राहणारे अबुलैस, उमेर व अनस (वय-१४) हे तिघे भाऊ मेहरुण तलाव परीसरात दुचाकीने फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुचाकी एका जागेवर उभी करून तलावाजवळ फिरत असतांना उमेर याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला व बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी अबुलैस हा पाण्यात उतरला़ मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाण्यात गाळ असल्याने दोघे जण बुडू लागले. दोन्ही भाऊबुडत असल्यामुळे तिसरा भाऊ अनस हा भेदरला आणि भावांना कुणीतरी वाचवावे म्हणून जोरजोरात आरडा-ओरड करत तो देखील पुढे सरसावला. मात्र तो बुडायला लागताच त्याने आरडा-ओरड केल्यानंतर तलाव परिसरात पोहणारे परवेज अख्तर सबिरोद्दीन पिरजादे, बबलू पिरजादे, मोहम्मद फैज, मोहसीन शेख, तेहसीम शेख यांना त्याचा आवाज ऐकू आला व कुणीतरी बुडत असल्याचे दिसले़ त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्याठिकाणी धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, तोपर्यंत अबुलैस व उमेर हे पाण्यात बुडाले होते. यावेळी पोहोणाऱ्यांनी अनसला तत्काळ बाहेर काढले. त्यामुळे तो बचावला. त्यानंतर बुडालेल्या बालकांना बाहेर काढले़ मात्र, दोघांचा मृत्यू झालेला होता़ त्यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात नेले़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोन्ही बालकांना मृत घोषित केले़
सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी
एकाच कुटूंबातील दोघ भावंडांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांसह मित्रमंडळींनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. मेहरुण तलावात आजपर्यंत अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या तलावाजवळ सुरक्षा रक्षकांची नेमणुक करावी. अन्यथा हा तलावात भर टाकून तो बुजून टाकावा अशी मागणी अनिस शेख अकबर यांनी केली. याबाबत आयुक्तांना देखील निवेदन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अन् जिल्हा रूग्णालयातच मिठात ठेवले मृतदेह
बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीला जाड (मोठ्या खड्यांच्या) मिठात ठेवल्यास तो जिवंत होतो, असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. रुग्णालयात दोघा भावंडाचे मृतदेह आणल्यानंतर काही जणांनी या मेसेजची माहीती नातेवाईकांना दिल्यानंतर शवविच्छेदन गृहात मिठ आणून दोन्ही बालकांचे मृतदेह मिठामध्ये ठेवण्यात आले़ या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हृदय हेलावणारा आक्रोश
दोन्ही भावांच्या मृत्यूची बातमी अक्सानगरात पसरताच जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृत बालकांचे वडील जकी अहमद हे पहूरपेठ शाळेत शिक्षक आहेत.
त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हृदय हेलावून टाकणारा आक्रोश केला होता. मुलांचा मृत्यू झाल्यामुळे वडील जकी अहमद यांना धक्काच बसला होता़
तर भावांचा सुध्दा आक्रोश सुरू होता़ बालकांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ बालकांच्या पश्चात आई-वडील व तीन भाऊ असा परिवार आहे़ अबुलैस हा इकरा महाविद्यालयात अकरावीला होता़ तर उमेर हा मिल्लत हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता़
हा चुकीचा समज आहे़ एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर ती परत जिवंत होत नाही़ मिठाच्या ढिगाºयात मृतदेह ठेवल्यास ती व्यक्ती जिवंत होते या व्हॉटस्अ‍ॅपवर आलेल्या संदेशामुळे नागरिकांची फसवणुक होत आहे़ कुणीही नागरिकांच्या भावनांशी खेळू नये़
- डॉ़ प्रदीप जोशी, मानसिकस्वास्थ टीम प्रमुख,़ अंधश्रध्दा निर्मुलन समिती

Web Title: The bodies were kept in salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव