घराजवळील अतिक्रमण काढण्यासाठी तरुणाचा एकट्याने बोदवडला ‘डफ’ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:45 IST2018-08-04T17:40:01+5:302018-08-04T17:45:03+5:30
घराजवळ एकाने अतिक्रमण करून थाटलेले दुकान तसेच नगरपंचायतीच्या गटारीमुळे घरात शिरत असलेल्या जंतूमुळे त्रस्त युवकाने वारंवार अर्ज करूनही दखल न घेतली गेल्याने शनिवारी बोदवड नगरपंचायतीवर एकट्याने डफ मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन देत जागे करण्याचा प्रयत्न केला.

घराजवळील अतिक्रमण काढण्यासाठी तरुणाचा एकट्याने बोदवडला ‘डफ’ मोर्चा
आॅनलाईन लोकमत
बोदवड, दि.४ : येथील प्रभाग क्रमांक पाच मधील दलित वस्तीत राहणाऱ्या संजय श्रावण बोदडे या तरुणाच्या घराजवळील अतिक्रमण काढले गेले नाही, तसेच गटारीचे पाणी दारापर्यंत पोहचून त्यातील जंतू घरात शिरकाव करीत असल्याबाबत नगरपंचायतीकडे वारंवार अर्ज- विनंत्या करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ शनिवारी एकट्याने डफ मोर्चा काढून नगरपंचायतीसमोर डफ वाजवून प्रशासनाला जागे करण्याचे अभिनव आंदोलन केले.
बोदडे याच्या घराजवळ नगरपंचायतीची सार्वजनिक गटार दारापर्यंत वाढली असून या गटारीला उंच बांधावे तसेच घरापुढे एकाने रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटल्याने या दुकानाचे अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अर्ज करीत पाठपुरावा केला. परंतु नगरपंचायतीकडून काहीच हालचाल होत नसल्याने आणि सदर तरुणाच्या घरात गटारीच्या पाण्यातील जंतू जात असल्याने त्याने गेल्या आठ दिवसांपूर्वीही प्रशासनाला निवेदन दिले होते. पण काहीच हालचाल होत नसल्याने या तरुणाने शनिवारी दुपारी बारा वाजता बोदवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नगर पंचायत कार्यालयावर एकट्याने ‘डफ’ वाजवत नगरपंचायत मुर्दाबादच्या घोषणा देत मोर्चा काढला. नगर पंचायत कार्यालयावर पोहचल्यावर त्याने तेथे डफ वाजवून प्रशासनाच्या कानात आवाज करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
सदर युवक डफ वाजवित नगरपंचायतीत गेल्यावर मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने या विषयाशी संबंधीत बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे, उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण यांनी निवेदन स्वीकारत गटारीचे काम करून देण्याचे आश्वासन दिले आहे.