कार्यादेश देवूनही काम न सुरू करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:24+5:302021-09-24T04:20:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असताना, याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळत आहे. ...

कार्यादेश देवूनही काम न सुरू करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असताना, याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळत आहे. मात्र, मनपा प्रशासनाला याबाबत कोणतेही गांभीर्य नसून, निधी असूनही निविदा काढण्याचे काम देखील मनपाकडून करण्यात येत नाही. त्यामुळे महापौरांनी मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कामावर नाराजी व्यक्त करत, ज्या ठेकेदारांना कार्यादेश देवूनही कामांना सुरुवात केलेली नाही, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.
शहरातील रस्त्यांचा कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात होणार असल्याचे आश्वासन महापौरांसह सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. मात्र, मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे निधी असूनही त्या निधीतून होणाऱ्या कामांचा निविदा रखडल्या आहेत. तर अनेक कामांबाबत कार्यादेश देवूनही कामांना सुरुवात झालेली नाही. याबाबत पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाची भूमिका समजून घेण्यासाठी गुरुवारी महापौरांनी आपल्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक अनंत जोशी, शहर अभियंता अरविंद भोसले, ॲड. दिलीप पोकळे, नितीन बरडे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.
महापौरांनी काय दिल्या सूचना
१. ठेकेदारांना पूर्ण काम झाल्याशिवाय बिलाची रक्कम देण्यात येवू नये, तसेच रनिंग बिल देण्यात येवू नये.
२. निविदा बांधकाम विभागानुसार नियम नुसार काढण्यात येतील.
३. सुट्टीच्या दिवशी देखील काम करून, निविदा काढण्याचे काम करा
४. रस्त्यांचा डागडुजीसाठी अतिरिक्त ४० कामगार यांची नियुक्ती करा.
५. कार्यादेश देवूनही ज्यांनी कामाला सुरुवात केली नाही, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका.
निधी मिळून झाले पाच महिने, निविदा ही नाही
शहरातील रस्त्यांचा कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मनपाला ६१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र, पाच महिने होवून देखील मनपाकडून केवळ १३ कोटींच्या निधीच्याच निविदा मनपाकडून काढण्यात आल्या आहेत. त्यात हा निधी मनपाला ३१ मार्चपर्यंत खर्च करायचा असून, वेळेवर निविदा काढण्यात आल्या नाहीत. तर हा निधी देखील परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विनाविलंब शहरातील रस्त्यांचा निविदा काढा, अशा सूचना माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी या बैठकीत दिल्या.