गटनेते नियुक्तीवरून भाजपची खंडपीठात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:12+5:302021-07-26T04:15:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजपने गटनेतेपदावरून बंडखोरांना थेट न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे. औरंगाबाद खंडपीठात भाजपने बंडखोर नगरसेवकांच्या ...

गटनेते नियुक्तीवरून भाजपची खंडपीठात याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपने गटनेतेपदावरून बंडखोरांना थेट न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे. औरंगाबाद खंडपीठात भाजपने बंडखोर नगरसेवकांच्या गटनेतेपदावरून याचिका दाखल केली असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. भाजप बंडखोरांनी नियुक्ती केलेले गटनेतेपद हे अनधिकृत असल्याचे सांगत भाजपने याबाबत थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
भाजपकडून स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील व गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक अरविंद देशमुख यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. मनपात झालेल्या सत्तांतरानंतर महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप व भाजप बंडखोरांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. भाजप बंडखोरांकडून मनपातील पदे भाजपकडून हिसकावली जात असल्याने भाजपची मनपातील स्थिती कोणत्याही शस्त्राविना लढाईत लढणाऱ्या सैनिकासारखी झाली आहे. त्यामुळे आता भाजपने कायदेशीरीत्या लढाई जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर भाजप बंडखोरांकडूनदेखील भाजपला धक्का देण्याचे सत्र सुरूच ठेवण्यात आले आहे.
उद्या भाजप बंडखोरही दाखल करणार याचिका
एकीकडे भाजप बंडखोरांनी नियुक्त केलेले गटनेते व उपगटनेत्यांना भाजपने अनधिकृत मानले आहे, तर दुसरीकडे याच गटनेत्यांनी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांना व्हीप बजावला होता. तो व्हीप भाजप नगरसेवकांनी धुडकावून लावला होता. या विरोधात भाजप बंडखोर नगरसेवकांकडून मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे भाजप नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. दिलीप पोकळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
येत्या महासभेत याच मुद्यावरून होणार खडाजंगी
भाजप बंडखोर व भाजप नगरसेवक एकमेकांविरोधात विभागीय आयुक्त व न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत, तसेच गटनेत्याची नियुक्ती झाल्यानंतर मनपाची एकही महासभा झालेली नाही. आता लवकरच आठवडाभरात महासभेचे नियोजन सुरू आहे. भाजप बंडखोर व भाजप नगरसेवकांमधील वादाचे पडसाद या महासभेतदेखील उमटण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपकडून विशेष रणनीती तयार केली जात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.