भाजपने राखला विजयाचा गड
By Admin | Updated: May 17, 2014 00:06 IST2014-05-17T00:06:56+5:302014-05-17T00:06:56+5:30
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मित्रपक्षासह भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी अभूतपूर्व एक लाख ३० हजार ७२३ मताधिक्याने विजय मिळविला.

भाजपने राखला विजयाचा गड
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मित्रपक्षासह भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी अभूतपूर्व एक लाख ३० हजार ७२३ मताधिक्याने विजय मिळविला. काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांना या निवडणुकीत सलग दुसर्यांदा पराभव पत्करावा लागला. निवडणूक आयोगाने व प्रशासनाने कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विजयी मिरवणुकीस परवानगी नाकारल्याने युतीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. या निवडणुकीसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी २४ एप्रिलला ५८.५२ टक्के मतदान झाले. यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आज मतमोजणी झाली. डॉ. भामरे विजयी झाल्याची दुपारी पावणेतीनला घोषणा झाली. आतापर्यंत लोकसभेच्या झालेल्या १६ निवडणुकांमध्ये सर्वाधिक मते आणि मताधिक्य मिळविण्याचा बहुमान भामरे यांना मिळविला आहे. पहिल्या फेरीपासून अंतिम २७ व्या फेरीपर्यंत भामरे यांची मताधिक्यात आघाडी कायम राहिली. काँग्रेस आघाडीचे उमेदवार पटेल यांना एकमेव मालेगाव शहरातच मताधिक्य मिळाले. स्वातंत्र्यापासून कायम राखीव संवर्गासाठी असलेला हा मतदारसंघ २००९ ला खुल्या गटासाठी झाला. ही संधी साधून त्या वेळी काँग्रेसचे नेते अमरिशभाई पटेल यांनी नशीब अजमावले होते. पण त्यांना गटबाजीसह जातीय समीकरणांमुळे पराभवास सामोरे जावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा पटेल यांना काँग्रेसमध्ये एकमताने उमेदवारी बहाल झाली. पण त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. भाजपचे प्रताप सोनवणे २००९ मध्ये फक्त १९ हजार ४१९ मतांनी खासदार झाले होते. मोदी यांची लाट आणि काँग्रेस आघाडीच्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांनी, पडद्याआडून काही राजकीय पदाधिकार्यांनी थेट नेत्यांना धडा शिकविण्यासाठी डॉ. भामरे यांच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे पटेल यांच्यासह आघाडीच्या स्थानिक नेत्यांचे विविध दावे, विविध समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी झालेली धडपड किती तकलादू, पोकळ निघाले, हे या निकालावरून दिसून येते. हिरे महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रात युतीच्या कार्यकर्त्यांचा आनंद वाढत गेला, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतल्याचे चित्र होते. शहरात ठिकठिकाणी भामरे यांच्या विजयामुळे तूफान आतशबाजी झाली. मतदारसंघातील युतीचे आमदार, पदाधिकारी जल्लोषात सहभागी झाले.