पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST2021-05-06T04:16:45+5:302021-05-06T04:16:45+5:30

जळगाव : पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारामागे नव्याने सत्तारूढ झालेल्या तृणमूल काँग्रेसचा ...

BJP's agitation against political violence in West Bengal | पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

जळगाव : पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारामागे नव्याने सत्तारूढ झालेल्या तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच अनुषंगाने बुधवारी शहरात भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करीत पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा निषेध नोंदवला.

जळगावात भाजप महानगरच्या वतीने विविध ९ मंडळांत धरणे आंदोलन करण्यात आले. त्यातील प्रमुख आंदोलन हे मुख्य बाजारपेठ असलेल्या दाणाबाजार परिसरात झाले. आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, महापालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

''ममता दीदी तेरी दादागिरी नही चलेगी''....

या आंदोलनात सहभागी झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ''नही चलेगी नही चलेगी, ममता दीदी तेरी दादागिरी नही चलेगी'', ''पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा निषेध असो'', ''बंगाल की गलिया सुनी हैं, ममता तू खुनी हैं'', ''भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या ममता बॅनर्जींचा निषेध असो'', अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.

हिंसाचारामागे तृणमूल काँग्रेसच

पश्चिम बंगाल राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो राजकीय हिंसाचार उसळला आहे, त्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा हात आहे. भाजप कार्यकर्त्यांची हत्या होत आहे. कार्यालये जाळली जात आहेत, हे अतिशय चुकीचे आणि निषेधार्ह आहे. भाजप हा देशातील क्रमांक एकचा पक्ष बनू पाहत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्या मानसिकतेतून असे प्रकार पश्चिम बंगाल राज्यात घडत आहेत. लोकांच्या मनात घर करायचे असेल, तर विकासाच्या मुद्यावर करता येते; पण तृणमूल काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेला हिंसाचार हा मानवतेला काळिमा फासणारा असल्याचे मत आमदार भोळे यांनी व्यक्त केले.

Web Title: BJP's agitation against political violence in West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.