महिलांवरील अत्याचारांविरोधात भाजप महिला आघाडीकडून शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:53+5:302021-09-17T04:20:53+5:30
रास्ता रोको आंदोलन : सरकारला बुद्धी देण्याची ‘बाप्पा’कडे केली मागणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये ...

महिलांवरील अत्याचारांविरोधात भाजप महिला आघाडीकडून शासनाचा निषेध
रास्ता रोको आंदोलन : सरकारला बुद्धी देण्याची ‘बाप्पा’कडे केली मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असल्याने राज्य सरकार हे अत्याचार रोखण्यास पूर्णपणे अपयशी ठरत आहे. राज्य शासनाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध करत, भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महिलांवरील अत्याचार निवारून, दोषींना तत्काळ शिक्षा करण्याबाबत राज्य शासनाला बुद्धी मिळो, यासाठी श्रीगणेशाची आरती करून साकडे घालण्यात आले आहे. त्यानंतर रास्ता रोको आंदोलनदेखील महिला आघाडीकडून करण्यात आले.
भाजप महिला आघाडीतर्फे येथे गुरुवारी नंदनवन कॉलनी मित्र मंडळ येथे गणपतीची आरती महिला आघाडीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच यावेळी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावेळी जिल्हा पदाधिकारी वंदना पाटील, रेखा पाटील, ज्योती निंभोरे, पूजा चौधरी, नगरसेविका प्रतिभा कापसे, दीपमाला काळे, महिला आघाडीच्या छाया सारस्वत, तृप्ती पाटील व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते.
रस्ता रोखून केले आंदोलन
गणेश कॉलनी रस्त्यावरील साईबाबा मंदिरासमोर भाजप महिला आघाडीकडून रास्ता रोको आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. सात महिन्यांत पाचशेपेक्षा अधिक महिलांवर अत्याचार आणि घटना नोंदविल्या गेल्या असून अजूनही शासनाला जाग आलेली नाही. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर कठोर नियम करून अशा अत्याचारींना तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद शासनाने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काही काळासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, नगरसेवक महेश चौधरी, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख धीरज वर्मा, मनोज काळे, मयूर कापसे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, जयंत चौहान, स्नेहा निंभोरे, रूपेश राणे, सनी पटेल, भूषण काकुस्ते उपस्थित होते.