बिनविरोधसाठी भाजपाची भोजनावळी

By Admin | Updated: July 31, 2014 14:56 IST2014-07-31T14:56:58+5:302014-07-31T14:56:58+5:30

जिल्हा परिषदेत ३१ रोजी शिक्षण, आरोग्य व क्रीडा समिती सभापती निवड असून, ती बिनविरोध व्हावी या दृष्टीने भाजपाने सर्व जि.प.सदस्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम घेण्याचे निश्‍चित केले आहे.

BJP pandit for unanimity | बिनविरोधसाठी भाजपाची भोजनावळी

बिनविरोधसाठी भाजपाची भोजनावळी

 

जळगाव : जिल्हा परिषदेत ३१ रोजी शिक्षण, आरोग्य व क्रीडा समिती सभापती निवड असून, ती बिनविरोध व्हावी या दृष्टीने भाजपाने सर्व जि.प.सदस्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम घेण्याचे निश्‍चित केले आहे. 
जि.प.अध्यक्षांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होईल. अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी सर्व सदस्यांशी संपर्क साधून कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. 
सभापती पदासाठी यावल तालुक्यातील हिंगोणा सावखेडेसीम गटातील सदस्य हर्षल पाटील यांचे नाव निश्‍चित झालेले असून, त्यांना मतदान करावे यासाठी भाजपातर्फे व्हीप बजावण्यात येणार आहे. ३१ रोजी सकाळी जि.प.अध्यक्षांच्या निवासस्थानी भाजपाच्या जि.प.सदस्यांना हा व्हीप दिला जाईल. गटनेत्या स्मिता वाघ यांनी त्यासंदर्भात बुधवारी सायंकाळी तयारी केली. 
युतीचे संख्याबळ ३६
युतीचे जि.प.मधील संख्याबळ ३८ होते, पण चोपडा तालुक्यातील सेनेच्या सदस्या कल्पना कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्रप्रकरणी कामकाजात सहभागी होता येत नाही. तर रक्षा खडसे यांनी जि.प.सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने युतीची सदस्य संख्या ३६ झाली आहे. तर विरोधकांची म्हणजे दोन्ही काँग्रेसचे मिळून ३0 सदस्य आहेत. यात युतीचे काही सदस्य गैरहजर राहिले किंवा कुठल्याशा कारणास्तव ऐनवेळी येऊ शकले नाही तर युती अल्पमतात येऊ शकते. 
यातच शिवसेनेतर्फेदेखील हर्षल पाटील यांना मतदान केले जावे यासाठी व्हीप काढला जाणार आहे. तो सेनेच्या सर्व सदस्यांना जि.प.अध्यक्षांच्या निवासस्थानी दिला जाईल, असे जि.प.तील शिवसेनेचे गटनेते ज्ञानेश्‍वर आमले म्हणाले. 
छत्रपती शाहू महाराज सभागृहात सभापती निवडणुकीसंबंधीचा कार्यक्रम दुपारी ११ ते एक वाजेदरम्यान नामनिर्देशन दाखल करता येईल. तीन वाजेनंतर माघार आणि त्यानंतर निवडीसंबंधीचा कार्यक्रम होईल. पीठासीन अधिकारी प्रांत असतील.

 

Web Title: BJP pandit for unanimity