प्रभागातील नगरसेवकही सांभाळण्यात भाजपचे नेते ठरले अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:15 IST2021-03-19T04:15:29+5:302021-03-19T04:15:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकी आधी सत्ताधारी भाजप मध्ये उभी फूट पडल्याने भाजपला ...

प्रभागातील नगरसेवकही सांभाळण्यात भाजपचे नेते ठरले अपयशी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकी आधी सत्ताधारी भाजप मध्ये उभी फूट पडल्याने भाजपला या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला आहे. भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नगरसेवक देखील सांभाळता न आल्याने पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपचे नगरसेवक असलेल्या जवळजवळ प्रत्येक प्रभागातून नगरसेवक फुटले आहेत. केबल प्रभाग क्रमांक सहा मधील चारही नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने मतदान केले.
२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक बहुमत मिळवत मनपामध्ये सत्ता स्थापन केली. मात्र अडीच वर्षाच्या कार्यकाळातच भाजपने मनपा मधील स्पष्ट बहुमत गमावले आहे. भाजपचा विजय जसा ऐतिहासिक ठरला, तसाच महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीआधी भाजप मध्ये पडलेली उभी फूट देखील ऐतिहासिक घटना ठरली आहे.भाजपचे तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेच्या गडाला लागल्याने भाजपवर अडीच वर्षातच मनपातील सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. कैलास सोनवणे, माजी महापौर सीमा भोळे, गटनेते भगत बालाणी, चंद्रकांत कापसे या भाजपच्या नेत्यांना आपल्या प्रभागातील नगरसेवक देखील सांभाळता न आल्याने भाजपवर अडीच वर्षातच सत्ता गमावण्याची वेळ आली आहे.
प्रभाग ६ मधील चारही नगरसेवक राहिले ठाम
१. प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील जवळपास सर्वच प्रभागांमधील भाजपचे नगरसेवक फुटले आहेत. प्रभाग क्रमांक एक ते तीन मधील संपूर्ण १२ नगरसेवक शिवसेनेकडे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे नगरसेवक कैलास सोनवणे यांचे हे नगरसेवक निकटवर्तीय मानले जात होते.
२. याच नगरसेवकांनी भारती सोनवणे यांना महापौर पदासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी ही गिरीश महाजन यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र हेच नगरसेवक आता शिवसेनेच्या गोटात सहभागी झाले.
३. प्रभाग क्रमांक सात हा माजी महापौर सीमा भोळे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे तथा आमदार सुरेश भोळे यांचा प्रभाग, मात्र या प्रभागातून देखील एक नगरसेवक फुटला आहे. प्रा.सचिन पाटील हे नगरसेवक सोमवार पर्यंत भाजपकडेच होते. मात्र मंगळवारी ते शिवसेनेकडे दाखल झाले. प्रा. सचिन पाटील हे आमदार सुरेश भोळे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
४) प्रभाग क्रमांक सहा मधील चारही भाजपचे नगरसेवक मात्र आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश आले आहे. ॲड. शुचिता हाडा, धिरज सोनवणे, व इतर दोन नगरसेवक आपल्याकडे ठेवण्यात अतुलसिंह हाडा यांना यश आल्याचे दिसत आहे.
चंद्रकांत कापसे व बालानी यांनाही अपयश
कैलास सोनवणे, सीमा भोळे, अश्विन सोनवणे यांच्यासह भाजपचे गटनेते भगत बालानी व चंद्रकांत कापसे यांनादेखील आप आपल्या प्रभागांमधील नगरसेवकांना सांभाळता आलेले दिसून येत नाही. भगत बालाणी यांच्या प्रभागातील रेश्मा काळे व मनोज अहुजा हे फुटले आहेत. तर चंद्रकांत कापसे यांच्या प्रभागातून प्रतिभा देशमुख यादेखील फुटल्या आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी अतिआत्मविश्वास बाळगल्यानेच भाजप नगरसेवकांवर ही वेळ आल्याचे ही बोलले जात आहे.