डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
By Admin | Updated: May 14, 2014 00:48 IST2014-05-14T00:48:49+5:302014-05-14T00:48:49+5:30
तालुक्यात डेंग्यूसदृश विषाणुजन्य ताप व उष्माघात झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
रावेर : तालुक्यात डेंग्यूसदृश विषाणुजन्य ताप व उष्माघात झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तथापि ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य कर्मचारी स्वयंस्फूर्तीने कर्तव्यदक्षता दर्शवून सर्वेक्षणाद्वारे अशा बाधित रुग्णांचे निदान करीत नसले तरी आरोग्य यंत्रणेला सजग करणार्या खासगी तज्ज्ञ डॉक्टर्स व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीकडे ‘नाव-गावाचे’ कारण सांगून उलट तपासणी करीत आहेत. अशा कर्तव्यात हयगय करणार्या कर्मचार्यांविरुद्ध जिल्हा आरोग्य प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तालुक्यात डेंग्यू व डेंग्यूसदृश विषाणूजन्य ताप तथा उष्माघाताचा फटका बसलेल्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रावेर शहरातील विशेषतज्ज्ञ डॉक्टरांची रुग्णालये चक्क हाउसफुल्ल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. खासगी डॉक्टरांच्या हवाल्याने काही डेंग्यूचे निदान झालेल्या रुग्णांचे नाव व गावही देण्यात आले होते. संबंधित डॉक्टरांनी दिलेल्या नाव-गावात गफलत झाल्याचा धागा पकडून उटखेड्याचे मुख्यालयी न राहणारे आरोग्यसेवक ए. आर. शेख यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधी व खासगी डॉक्टरांकडे ‘त्या’ रुग्णांच्या नावगावाचे कारण सांगून उलट तपासणी सुरू केली. मुख्यालयी हजर न राहता ग्रामस्थांचे आरोग्य वेशीवर टांगणार्या शेख यांनी घड्याळाच्या काट्यामागे धावण्याखेरीज कधीही कर्तव्यदक्षता दर्शवून सर्वेक्षणाची मोहीम वा आरोग्य तपासणी करून रुग्णांचे निदान करण्यात कार्यतत्परता दर्शवली नाही. उलट काखेत कळसा घेऊन गावाला वळसा घालण्याचा प्रकार केल्याने जनसामान्यात कमालीचा संताप व्यक्त होत आहे. आरोग्य यंत्रणेला सजग करणारी प्रसारमाध्यमे व खासगी वैद्यकीय यंत्रणेला वेठीस धरण्याचा जि.प. आरोग्य कर्मचार्यांचा हा प्रकार निंदनीय आहे, असे बोलले जात आहे. अशा कर्मचार्यांविरुद्ध जि.प. आरोग्य प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. डेंग्यूसदृश विषाणुजन्य तापाची तालुक्यात साथ असताना, तसेच उष्माघाताने दोन बळी गेले असताना रुग्णांचे सर्वेक्षण, उपचार व उपाययोजना यासंबंधी कर्तव्यदक्षता व कार्यतप्तरता न दर्शवता कर्तव्यात हयगय करून त्या उलट बाता मारण्याचा प्रकार थांबविला गेला पाहिजे, अशीही मागणी होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन याप्रकरणी उचित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)