मोठे ते खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:02+5:302021-06-21T04:13:02+5:30

रात्रीचे दहा वाजले होते. संग्रामचा फोन आला. ‘हॅलो, हॅलो... योगेश कुठे आहेस?’ ‘अरे मी इथेच आहे? थोडा मित्रांबरोबर चहा ...

Big to false | मोठे ते खोटे

मोठे ते खोटे

रात्रीचे दहा वाजले होते. संग्रामचा फोन आला. ‘हॅलो, हॅलो... योगेश कुठे आहेस?’ ‘अरे मी इथेच आहे? थोडा मित्रांबरोबर चहा पितोय, गप्पा मारतोय, बोल ना काय काम आहे.’ ‘अरे योगेश मी आज सकाळीच आलो आहे. थोडे विद्यापीठामध्ये काम होते आणि आज दिवसभरातील कामे आटोपून घेतली. उद्या मला गावाकडे जायचे आहे? पण जाता जाता गुरुजींना भेटायचे आहे. तुला वेळ असेल तर उद्या सकाळी आठ- साडेआठदरम्यान त्यांना भेटू.’ मी होकार दिला व त्याला सांगितले की, ‘तू निघताना मला फोन कर. मी रस्त्यात येऊन थांबतो. मग आपण दोघं मिळून गुरुजींना भेटायला जाऊ, ठीक आहे, गुड नाईट.’ गुरुजी तसे प्रख्यात लेखक, साहित्यिक, विचारवंत, अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

ते संग्रामला वरवरचा जीव लावायचे. संग्राम त्यांचा विद्यार्थी होता. तरीपण अधूनमधून संग्राम म्हणायचा, अरे, सर जरी अशा प्रकारचे असतील तरीपण म्हणावे तेवढे लक्ष देत नाहीत. स्वतःचा मोठेपणा, स्वार्थीपणा, पैसे कमावणे, माणसाला वापरून घेणे, एवढेच काम ते फार जोमाने करतात.

स्वतःचे नाव व्हावे त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.

तरीपण ते जरी तसे असले तरी आपण मानवता, माणुसकी टिकवून ठेवली पाहिजे. त्यामुळे आपण भेटले पाहिजे. तसे पाहिले तर मलाही त्यांना भेटावसे वाटत नाही... कारण त्यांनी माझ्यासाठी म्हणावे तेवढे काही केले नाही किंवा मी मोठं व्हावं त्यासाठीही मलाच काय माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना ते संधीही देत नव्हते; परंतु त्यांचा जवळचा कोणी असेल, नातेवाईक असेल तो त्यांना जरी भेटत नसेल, त्यांच्याकडे येत नसेल तरी पण त्याला मात्र पुढे घेऊन जाण्यासाठी फार प्रयत्न करायचे. माझ्यासारख्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या कामासाठी वापरून घ्यायचे.

तसा संग्राम संवेदनशील, भावनाशील आणि विचारशील होता. तत्त्वाला जागणारा होता. तोही कधी- कधी सरांचा राग- राग करायचा. कारण सर बोलायचे वेगळे, करायचे वेगळे आणि वागायचे वेगळेच. हे त्याला बघवत नव्हते. त्यामुळे त्याला

सरांचा राग, चीड, संताप येत होता.

सकाळी सकाळी साडेसात- पावणेआठदरम्यान संग्रामचा फोन आला. ‘हॅलो योगेश झाला तयार. मी निघतोय आता. अर्ध्या तासात तिथे पोहोचतो. तू लवकर ये. उशीर करू नकोस. मला पुढे जायचे आहे.’ मी म्हणालो, ‘ठीक आहे, मी तयारच आहे. मी येतो.’ घाईघाईने संग्रामने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघालो. कारण आपण वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे. तसा मी पोहोचलो. संग्रामही अगदी पाच मिनिटांत तिथे आला. त्याने गाडी थांबवली. पुढचा गाडीचा दरवाजा उघडून मी त्याच्याजवळ बसलो. त्याला आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

कारण आम्ही असे खूप दिवसांनी भेटलो होतो. थोड्या गप्पा झाल्या. रस्त्यात सरांच्या घरांच्या अलीकडे एक चांगले हॉटेल होते. तिथे आम्ही चहा घेतला. थोड्या गप्पा मारल्या. संग्रामचे कुटुंब सोबत होते. सरांना संग्रामने फोन केला. हॅलो, ‘नमस्कार सर, संग्राम बोलतोय... इथे आलो होतो. रात्री फोन केला होता, गावाकडे जायला निघालो आहे. जाता जाता आपल्याला भेटावं म्हणून तुमच्या घराच्या बाजूनं जातो आहे.’

‘हा हा याना घरी, मी आहेच घरी...’ आम्ही सरांच्या घरी पोहोचलो. सर एकटेच घरी होते. पेपर वाचत बसले होते. या म्हणाले, आम्ही जाऊनघरात बसलो. सरांनी इकडच्या-तिकडच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. गप्पा मारून दहा-पंधरा मिनिटे झाली की, सरांचे लक्ष संग्रामच्या मुलाकडे गेले. सर आतमध्ये गेले व त्यांनी बिस्किटाचा अर्धा पुडा संग्रामच्या मुलाच्या हातावर टेकवला व म्हणाले, ‘रात्री नातवंड आले होते. त्यांना बिस्किटाचा बॉक्स आणला होता. त्यातील बिस्किटे आहेत, अजून देऊ का?’ सर खुर्चीवर बसले. संग्राम आणि मी त्या मुलाच्या हातात दिलेल्या बिस्किटांकडे पाहत होतोत. मी संग्रामकडे आणि संग्राम माझ्याकडे पाहत होता. दोघांचे लक्ष एकदाच त्या बिस्किटाच्या पुड्याकडे गेल्यामुळे दोघेही समजून गेलो. तसा मी संग्रामला बाहेर निघण्याचा इशारा केला. दोघेही बाहेर आलो. मी संग्रामला म्हणालो, आपली खूप दिवसांनी भेट झाली आहे. तुम्हाला तिथपर्यंत मी सोडतो. आपण नाश्ता करू आणि मग तू मात्र पुढे जा. गावाकडे जायला तुला वेळ होईल. त्यामुळे नाश्ता करू. त्या हॉटेलवर पोहोचलो. खाली उतरलो. वेटरला ऑर्डर दिली. तोपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता संग्रामला म्हणालो, अरे हा माणूस किती श्रीमंत आहे, किती पैशावाला आहे, किती पैसे कमवतो आहे आणि त्यांनी मात्र आपल्या या छोट्या बाळाच्या हातामध्ये बिस्किटांचा अर्धा पुडा टेकवला. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. खरेतर समाजातील अनेक लोक मार्गदर्शन, संस्कार करत असतात. त्यांच्याकडे समाज आदर्श म्हणून

पाहत असतो; पण तेच जर आज अशा कोत्या मनाने वागत असतील, तर समाजाचे काय भले होणार? ज्यांचे पोट हातावर आहे, ज्यांच्या घरी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, अशांच्या घरी कुणी एखादा पाहुणा गेला, तर बाळाचं कौतुक केलं जातं.

त्याच्या बाळाला संपूर्ण बिस्किटाचा पुडा दिला जातो अन्‌ मोठ्या म्हणून घेणाऱ्या खोट्या आणि छोट्या मनाच्या माणसानं हे कृत्य

करणं किती वाईट आहे. अशीच माणसं आज समाजाला फसवत आहेत. हे समाजाच्या वेळीच लक्षात यायला हवं. खरंच मोठे ते खोटे असतात. तेच खरं आहे.

Web Title: Big to false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.