बोदवडची ब्रिटिशकालीन ओळख असलेले बायबल कॉलेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 19:07 IST2018-12-19T19:05:21+5:302018-12-19T19:07:40+5:30
बोदवड शहराच्या मुख्यालयापासून बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर नाडगाव येथे ख्रिस्ती बांधवांचे ख्रिस्ती धर्मावर शिक्षण देणारे महाराष्टÑातील पहिले महाराष्ट्र बायबल कॉलेज आहे. येथेही चर्चा असून, ख्रिसमसची तयारी सुरू आहे.

बोदवडची ब्रिटिशकालीन ओळख असलेले बायबल कॉलेज
गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : बोदवड शहराच्या मुख्यालयापासून बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर नाडगाव येथे ख्रिस्ती बांधवांचे ख्रिस्ती धर्मावर शिक्षण देणारे महाराष्टÑातील पहिले महाराष्ट्र बायबल कॉलेज आहे. येथेही चर्चा असून, ख्रिसमसची तयारी सुरू आहे.
या कॉलेजची स्थापना सन १९०७ मध्ये सुमारे १० एकर जागेवर अमेरिकेचे रेव्ह. ख्रिश्चन आयकर यांनी केली व पहिले प्राचार्य म्हणून कार्यही बजावले. बायबलचे शिक्षण देणारे महाराष्ट्रातील पहिले कॉलेज ठरले असून, आज १११ वर्षे पूर्ण झाले आहे.
या कॉलेजमधून ख्रिस्त धर्माची शिकवण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात कॉलेजचे नावलौकिक करीत आहेत. काही मिशनरी पालक, शिक्षक, पादरी म्हणून कार्य करीत आहेत, तर दरवर्षी या कॉलेजला विदेशातील ख्रिस्तधर्मीय बांधव मार्गदर्शन, समुपदेशन करण्यासाठी येत असतात. यात आॅस्ट्रेलियातील रेव्ह.जॉन असेंन केस हे संस्थेला भेट देतात व मार्गदर्शन करीत असतात.
ब्रिटिशांनी सत्ता काळात बायबल कॉलेज हे ख्रिस्त बांधवांना नागपूर-मुंबई लोहमार्गावर बोदवड या रेल्वेस्थानकावर थांबण्यासाठी व प्रार्थनेसाठी ही जागा निवडली. १० एकर जागेवर ब्रिटिशकालीन इमारत तसेच मराठी अलायन्स चर्चची निर्मिती केली. नंतर येथे धर्माची शिकवण देण्यासाठी कॉलेज स्थापन करण्यात आले असून, आजपावेतो ते कार्य मिशनरीद्वारा सुरू आहे.
प्रभू येशूच्या जन्मानिमित्ताने बायबल कॉलेज व चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यात नित्य प्रार्थना केली जाते. विशेष म्हणजे तालुक्यात कोठेही ख्रिस्त बांधव संख्येने नसतानाही चर्चद्वारे प्रभू येशूचा शांती-प्रेमाचा संदेश देण्यात येतो.
या संस्थेला १५ वर्षे प्रशासक म्हणून प्रभूदास पांडे यांनीही सेवा दिली आहे. संस्थेची अविरत प्रगती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आजही संस्थेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून, यात तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे.