कुरियरचे २४ हजाराचे बॉक्स लांबविले
जळगाव : मालवाहू रिक्षात असलेले ऑइल पॅकिंग मटेरियलचा २४ हजार ३१५ रुपये किमतीचा बॉक्स लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अफजल खान हमीद खान (रा.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ जानेवारी रोजी नवी पेठ ते एमआयडीसी दरम्यान वाहतूक करीत असताना हा बॉक्स चोरी झाला आहे.
पोलिसांसाठी आजपासून लसीकरण
जळगाव : जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी १ फेब्रुवारीपासून कोविड-१९चे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. याबाबत संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून ३ हजार ४२० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंदणी झाल्याची माहिती नोडल अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली. दरम्यान, प्रत्येक कर्मचाऱ्याला लसीकरणाची तारीख, वेळ व हॉस्पिटल याची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.