भाग्यश्री पाटील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:59+5:302021-06-19T04:11:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने आयोजित केलेल्या ऑनलाइन राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महिला फिडे मास्टर ...

Bhagyashree Patil National Chess Championship winner | भाग्यश्री पाटील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेती

भाग्यश्री पाटील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेती

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने आयोजित केलेल्या ऑनलाइन राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महिला फिडे मास्टर खेळाडू भाग्यश्री पाटील हीने ११ फेऱ्यांअखेर ९ गुणांची कमाई करत १६ वर्षा आतील गटात विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत देशभरातून १८६ खेळाडू सहभागी झाले होते. शुक्रवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या कामगिरीमुळे भाग्यश्री पाटील हिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली.

या आधी भाग्यश्री हिने सात वर्षा आतील गटाचे राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद आणि १० वर्षाआतील गटात जागतिक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते. या कामगिरीमुळे भाग्यश्री हिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

अखेरच्या फेरीत केली मात

१० व्या फेरीनंतर भाग्यश्री पाटील, अहाना पाचीगर, गुजरातची रिद्धी पटेल आणि तामिळनाडूची रत्नप्रिया के. या आठ गुणांसह बरोबरीत होत्या; मात्र ११ व्या फेरीत भाग्यश्रीने अहाना पाचीगरला पराभूत करत ९ गुणांची कमाई केली आणि अव्वल स्थान राखले. तर रत्नप्रिया के. आणि रिद्धी पटेल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धींसोबत अकराव्या फेरीतील सामना बरोबरीत सोडवला. भाग्यश्री आणि रिद्धी या दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेच्या अखेरीस ९ गुण कमावले होते; मात्र टायब्रेकरमध्ये सरस गुणांच्या आधारे भाग्यश्री विजेती ठरली. धान्या पटेल आणि रत्नप्रिया के. या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिल्या. १९५८ फिडे रेटिंग भाग्यश्रीने आपल्यापेक्षा जास्त फिडे रेटिंग असलेल्या खेळाडूंनाही या स्पर्धेत मागे टाकले आहे.

या यशाबद्दल बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, सहसचिव संजय पाटील, शकील देशपांडे, अतुल मेहता, आर.के.पाटील, फारुक शेख, चंद्रशेखर देशमुख,पी.के.करणकर, अरविंद देशपांडे, नरेंद्र पाटील,रवींद्र धर्मधिकारी, ॲड.अंजली कुलकर्णी, तेजस तायडे, प्रवीण ठाकरे यांनी तिचे कौतुक केले आहे.

कोट - गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे स्पर्धादेखील कमी होतात; मात्र अशा काळात सरावदेखील कमी झाला होता. महिनाभर आधी राष्ट्रीय स्पर्धेची माहिती मिळाली. त्यानंतर मोठा भाऊ प्रतीक याने सराव करून घेतला, तसेच जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनीही सातत्याने प्रोत्साहन दिले. ९ वर्षांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळाले. त्याचा आनंद आहे. - भाग्यश्री पाटील.

Web Title: Bhagyashree Patil National Chess Championship winner