आता व्हा आत्मनिर्भर; २५३ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:27+5:302021-09-04T04:20:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत ...

आता व्हा आत्मनिर्भर; २५३ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याला २५३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत ७७ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२०-२१ ते २०२४-२५ अशी पाच वर्षे राबविली जाणार आहे. यांतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहेत. यासाठी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत काम सुरू झाले असून संसाधन व्यक्ती इच्छुकांची माहिती संकलित करीत आहेत.
एक जिल्हा एक उत्पादनमध्ये जिल्ह्यासाठी केळीची निवड करण्यात आली आहे. यात कार्यरत असलेले उद्योजक व नव्याने लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योगांना याचा मोठा लाभ होणार आहे. ही योजना राबवीत असताना जिल्ह्याला २५३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात आतापर्यंत ७७ अर्ज ऑनलाइन आले असून यातील ४७ अर्जदारांशी संसाधन व्यक्ती संपर्क साधत आहे. तसेच ११ अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहे. शिवाय १९ प्रकरणे बँकांकडे सादर करण्यात आले असून दोन प्रकरणे मंजूरदेखील झाली आहेत.
कोणाला घेता येणार लाभ?
एक जिल्हा एक उत्पादनमध्ये कार्यरत असलेले उद्योजक व नव्याने लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योगातील उद्योजक, वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, फेडरेशन, उत्पादक सहकारी संस्था यात सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.