'रिफाइंड' असो की लाकडी घाणा...तेल कमीच आणा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:25+5:302021-08-18T04:22:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रिफाइंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत ...

'रिफाइंड' असो की लाकडी घाणा...तेल कमीच आणा !
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रिफाइंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत आहे. मात्र, अशा जाहिरातींना भुलून तेलाची निवड करण्यापेक्षा आपली जनुके, वास्तव्याचे ठिकाण, परंपरा लक्षात घेऊन तेलाची निवड करणे आवश्यक असते. तेल घाण्याचे असो की रिफाइंड ते कमीच वापरावे, याकडे हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
आहारात तेलाचा जास्त वापर केल्याने रक्तदाब, स्थूलता, हृदयरोग आदी विकारांना आमंत्रण मिळते. अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाशी संबंधित विकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. शहरात लाकडी घाण्याची दुकाने पाहायला मिळत आहेत. घाण्यावर काढलेल्या तेलात गुड कोलेस्टेरॉल अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, जाहिराती आणि ट्रेंडला न भुलता योग्य तेलाची निवड करणे आवश्यक ठरते.
०००००००००००
रिफाइंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे त्याचा अधिक वापर हा शरीरासाठी घातक आहे. घाण्याच्या तेलात कुठलीही रासायनिक प्रक्रिया होत नाही. मात्र, ते कमी दिवस टिकणारे असते़ त्यामुळे नागरिक रिफाइंड तेलाकडे वळले. परंतु, तेल हे कुठलेही असो त्याचे प्रमाण कमी असणेचं गरजेचे आहे. ज्यांना हृदयाचे आजार आहे तसेच कॉलेस्टेरॉल वाढलेले आहे, अशांनी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. शरिरातील प्रोटीन मिळणे गरजचे आहे. त्यासाठी पालेभाज्यांचा वापर आहारात करणे आवश्यक आहे. तेलाच्या अतिवापरामुळे शरिरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात.
- डॉ. विवेक चौधरी, हृदयरोगतज्ज्ञ
००००००००००
शरीरिला प्रोटीन मिळणे गरजेचे आहे़ नियमित व्यक्तीला १.१ किंवा १.२ ग्रॅम तर खेळाडूंना १.५ ते २ ग्रॅम पर्यंत प्रोटीन मिळायला हवे. त्यातच शरीराच्या वजनानुसार ०.५ ते ०.७ ग्रॅम तेल शरीराला आवश्यक असते. दुसरीकडे पाणी अधिक पिणे हे शरीरिरासाठी सर्वाधिक चांगले असते. कुठलेही तेल घेतले त्यात कॅलरी सारखीच असते़ त्यामुळे संतुलित आहार असणे आवश्यक आहे. प्रोटीनसाठी पनीर, सोयाबिन, अंडी, राजमा, मुग, मटकी, चना आदींचा आहारात वापर करू शकता. तसेच दिवसभरात दोनशे ग्रॅम पालेभाज्या खायला हवे.
- डॉ. सुयोग चोपडे, आहारतज्ज्ञ
००००००००००
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
वाढत्या विविध आजारांच्या दृष्टीने आता नागरिकांकडून सुध्दा आहाराबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. रिफाइंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केली जात असल्यामुळे आता नागरिकांनी लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे आता शहरांमध्ये लाकडी घाण्याचे तेलाचे दुकाने पहायला मिळत आहे.