आघाडीची अस्तित्वासाठी लढाई
By Admin | Updated: August 25, 2014 14:52 IST2014-08-25T14:52:19+5:302014-08-25T14:52:19+5:30
रेल्वे, वीज, केळी आणि कापसाचा प्रांत म्हणून वेगळी ओळख असलेल्या भुसावळ विभागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे

आघाडीची अस्तित्वासाठी लढाई
पंढरीनाथ गवळी ■ भुसावळ
रेल्वे, वीज, केळी आणि कापसाचा प्रांत म्हणून वेगळी ओळख असलेल्या भुसावळ विभागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते आमदार एकनाथराव खडसे यांना रोखण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे.
भुसावळ विभागात भुसावळसह मुक्ताईनगर, रावेर, बोदवड आणि यावल या पाच तालुक्यांचा समावेश असला तरी या विभागात भुसावळ, रावेर आणि मुक्ताईनगर असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.
पैकी भुसावळ : आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, रावेर : अपक्ष (काँग्रेस सहयोगी) आणि मुक्ताईनगर : भाजपच्या ताब्यात आहे.
तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या विभागातील तीनही मतदारसंघात मोदी लाटेमुळे भाजपाला मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे महायुतीत उत्साह आहे. आघाडीत मात्र अद्यापही उत्साहाचे वातावरण नसल्याची स्थिती आहे.
भुसावळ विधानसभा मतदारसंघ मागील निवडणूक म्हणजे २00९ पासून अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय सावकारे प्रथमच या मतदारसंघातून निवडून आले. या आधी २00४ ते २00९ या दरम्यान, राष्ट्रवादीचे संतोष चौधरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता तिसर्या वेळी राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ पुन्हा आणण्यासाठी पालकमंत्री संजय सावकारे यांचीही कसोटी लागणार आहे.
याशिवाय महायुतीतील शिवसेनेकडे भुसावळची जागा आहे. शिवसेनेने उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केली नाही. मात्र २00९ मध्ये आघाडीचे सावकारे यांना शिवसेनेचे अँड.राजेश झाल्टे यांनी चांगली लढत दिली होती. या वेळी शिवसेनेकडून कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचा मोठा भरणा राहणार आहे. त्यामुळे मतांची विभागणी होऊन राष्ट्रीय राजकीय पक्षांचा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
२00९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत रावेर विधानसभा मतदारसंघ उदयास आला. यामुळे यावल विधानसभा मतदारसंघाचे नाव राजकीय नकाशावरून पुसले गेले. रावेर आणि यावल हे दोन तालुके मिळून रावेर मतदारसंघ झाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख होती. आता या मतदारसंघात अपक्ष आमदार शिरीष चौधरी आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रावेरला आले होते. त्यांनी त्या वेळी आमदार चौधरी यांच्या नावापुढील काँग्रेसचे सहयोगी आमदार हा शब्द काढून काँग्रेसचे आमदार व्हा, असा शब्द दिला आहे. त्यामुळे आमदार चौधरी तयारीला लागले आहेत. दरम्यान, रावेरमधून भाजपा कोण उमेदवार देणार यावरही बरेच काही अवलंबून आहे.
खडसे यांना रोखण्याचे आव्हान
भाजपा व विरोधी पक्षनेते आमदार एकनाथराव खडसे हे गेल्या २५ वर्षांपासून सलग मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता या वेळी ते सहाव्यांदा विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत.
खडसे यांना विधानसभेत जाण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसमोर आहे. त्यासाठी त्यांना खडसे यांना सर्व ताकदीनिशी लढत देऊ शकेल, असा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यासाठी उमेदवाराचा शोध सुरू आहे.
------------------
> भुसावळ विभागातील एकमेव मुक्ताईनगर संघ भाजपाच्या ताब्यात आहे. विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
> रावेर विधानसभा मतदारसंघ अपक्ष आमदारांकडे आहे. शिरीष चौधरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
> भुसावळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. संजय सावकारे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.