आरोपीकडे सापडले गावठी पिस्तुल
By Admin | Updated: March 27, 2017 00:27 IST2017-03-27T00:27:25+5:302017-03-27T00:27:25+5:30
कृष्णा सोनवणे याच्याकडे रविवारी दुपारी साडे चार वाजता आसोदा रस्त्यावर मोहन टॉकीज परिसरात गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस आढळून आले.

आरोपीकडे सापडले गावठी पिस्तुल
जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या कृष्णा विक्रम सोनवणे (वय २२ रा.प्रजापत नगर,जळगाव) याच्याकडे रविवारी दुपारी साडे चार वाजता आसोदा रस्त्यावर मोहन टॉकीज परिसरात गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस आढळून आले. हे पिस्तुल बाळगून कृष्णा हा प्रजापत नगर व वाल्मिक नगरात दहशत माजवत होता. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रजापत नगर व मोहन टॉकीज परिसरात एका तरुणाकडे कमरेला पिस्तुल लावलेले आहे, मात्र ते खेळण्याचे आहे की, खरे याबाबत सांशकता आहे, परंतु हे पिस्तुल दाखवून तो दहशत पसरवित असल्याची गुप्त माहिती शनी पेठचे पोलीस कर्मचारी जितेंद्र सोनवणे यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी जितेंद्र सोनवणे, अनिल धांडे, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, नरेंद्र सपकाळे, संजय धनगर व मोतीलाल पाटील यांचे पथक तत्काळ दोन्ही ठिकाणी रवाना केले.
कृष्णा हा निकेश सोनवणे याच्या खुनातील आरोपी असल्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगितले. २०१४ मध्ये निकेशचा खून झाला होता.
पोलिसांनी आवाज देताच काढला पळ
मोहन टॉकीज परिसरात एका पानटपरीवर वर्णनानुसार कृष्णा हा दिसून आला. गणेश गव्हाळे यांनी त्याला विचारणा करताच तो तेथून पळत सुटला. पसार होण्याच्या आत पुढे थांबलेल्या अन्य सहकाºयांनी त्याला घेरुन पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल व त्यात एक जीवंत काडतूस आढळून आले.