गावठी पिस्तुलचा धंदा सुरुच
By Admin | Updated: September 30, 2015 00:29 IST2015-09-30T00:29:13+5:302015-09-30T00:29:13+5:30
जळगाव : जिल्ह्यात गावठी पिस्तुलची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. मंगळवारी पुन्हा अजय सैंदाण या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून पिस्तुलसह ताब्यात घेतले.

गावठी पिस्तुलचा धंदा सुरुच
जळगाव : जिल्ह्यात गावठी पिस्तुलची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गेल्या आठवडय़ात जामनेर व वाकोद येथून दोन गावठी पिस्तुलसह आरोपींना पकडल्यानंतर मंगळवारी पुन्हा अजय रमेश सैंदाणे (वय 26, रा.मल्हारपुरा, चोपडा) या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून पिस्तुलसह ताब्यात घेतले. त्याच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा येथे एका तरुणाकडे गावठी पिस्तुल असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळाली होती. त्यानुसार रायते यांनी सहायक फौजदार मुश्ताक अली सैयद, मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, अशोक चौधरी, ईश्वर सोनवणे, योगेश पाटील, मनोज दुसाने, दर्शन ढाकणे, गायत्री सोनवणे व छाया मराठे आदींचे एक पथक तयार चोपडा येथे पाठविले. मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव चौफुलीवर पथकाने सापळा लावला. अजय हा दुचाकीने (एम.एच.19 बी.एच.3058) निघण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात पंधरा हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आढळून आले. चोपडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्याला पिस्तुल व दुचाकीसह जळगावला आणण्यात आले. यापूर्वीही त्याच्यावर 395 चा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. मध्य प्रदेशातून होते तस्करी गावठी पिस्तुलची तस्करी मध्य प्रदेशातून होत असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील सातपुडय़ाच्या कुशीतील काही गाव तसेच मध्यप्रदेशात उमर्टीसह आणखी काही गावांमध्ये पिस्तुल बनविले जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ऑर्डरनुसार यावल, रावेर व चोपडा मार्गे हे गावठी पिस्तुल जिल्ह्यात आणले जातात. या तस्करीत दलालही सक्रीय असल्याचा संशय आहे.