केळीची उभी झाडे कापून फेकली
By Admin | Updated: February 2, 2017 01:00 IST2017-02-02T01:00:53+5:302017-02-02T01:00:53+5:30
चिनावल शिवारातील घटनेने संताप : शेतक:याचे दोन लाखांचे नुकसान, कारवाईची मागणी

केळीची उभी झाडे कापून फेकली
सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल शिवारात असलेल्या चिनावल-कोचूर रस्त्यावरील विकास भास्कर महाजन यांच्या शेतातील निसवणीवर आलेली केळी 31 जानेवारी रोजी रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने कापून फेकल्याने त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेने चिनावल परिसरात संताप व्यक्त होत आहे.
सावदा येथून जवळच असलेल्या कोचूर येथील रहिवासी विकास महाजन यांचे चिनावल शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या शेतात मागील वर्षी सुमारे तीन हजार केळीच्या खोडाची लागवड केली होती. पोटच्या पोराप्रमाणे त्यांची वर्षभर जपवणूक केली. त्यानंतर आता जानेवारी 2017 मध्ये ही केळी निसवत असताना व काही कापणी योग्य झाली होती. यंदा सुदैवाने केळीस चांगले भाव असल्याने यातून चांगले उत्पन्न मिळणार होते त्यातून मागील देणीघेणी पूर्ण होतील या आशेवर असताना 31 रोजी विकास महाजन यांनी सायंकाळी सहा वाजेदरम्यान शेतात जाऊन पाहणी केळी सर्व दूर नजर फिरवून त्यांचे मन प्रसन्न होते. त्यानंतर ते घरी गेले व 1 रोजी सकाळी शेतात गेल्यावर त्यांची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली त्यांना दिसली. त्यांच्या शेतातील सर्व केळी कोणीतरी अज्ञात इसमाने कापून फेकल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्षभर केलेली मेहनतदेखील वाया गेली. यामुळे ते पुरते कोलमडून पडले आहेत. याबाबत त्यांनी सावदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आज केळी भाव आपले सर्वोच्च स्थानी असताना यातून आपणास चांगले उत्पन्न मिळणार अशी त्यांना आशा होती. कारण मागील काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती व भाव नसल्याने शेतकरी हैराण होते. मात्र आज परिस्थिती चांगली असताना व हातातोंडाशी आलेला घास असा वैर भावनेने कोणीतरी हिरावून नेला. याबाबत गुन्हा दाखल झाला असला तरी यापूर्वीदेखील अशा किती तरी घटना घडल्या आहेत यात प्रथम आरोपी समजून येत नाही. आलाच तर वेगवेगळे दबाव तंत्र अवलंबून त्यांना वाचविण्यात येते; मात्र शेतक:यांचे जीवन मात्र खराब होत असल्याने अश्या व्यक्तीविरोधात आता कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.