बोरी धरणाचे बॅक वॉटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:59+5:302021-09-06T04:21:59+5:30
पारोळा : तामसवाडी येथील बोरी धरणाचे १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर दुसरीकडे या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक ...

बोरी धरणाचे बॅक वॉटर
पारोळा : तामसवाडी येथील बोरी धरणाचे १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर दुसरीकडे या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे करमाड बुद्रुक येथील दहा घरांमध्ये बोरी धरणाचे बॅक वॉटर शिरले आहे. या घरांमधील सदस्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले
आहे. याबाबत करमाडचे पोलीस पाटील यांनी या घटनेची माहिती तालुका प्रशासनाला कळविली.
दरम्यान, तामसवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बोरी नदीकाठावरील १० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती प्रांत विनय गोसावी यांनी दिली.
सावखेडा खुर्द गावाचा
संपर्क तुटला.
वरखेडी ता. पाचोरा : उतावीळ नदी व भोजे - चिंचपुरे गावाकडून येणारी बहुळा नदीला आलेल्या पुरामुळे सावखेडा, खुर्द ता. पाचोरा या गावाचा संपर्क तुटला आहे. गावातून कुणीही बाहेर जाऊ शकत नाही व बाहेरून कुणीही गावात येऊ शकत नाही. यामुळे ग्रामस्थ दिवसभर गावातच अडकून
आहेत. दुग्ध व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
मुळातच या गावात बहुळा नदीवर असलेल्या कमी उंचीच्या फरशी पुलावरून पाणी ओसरलेलेच नाही. पूल मध्यभागी तुटलेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, संबंधितांना याबाबत याआधीही याची माहिती दिलेली होती. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हिवरा नदीपात्रात बेवारस युवकाचा मृतदेह
पाचोरा : शहरातून गेलेल्या हिवरा नदीपात्रात युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. हा मृतदेह कचरा, बाटल्या गोळा करणाऱ्या बेवारस युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले. नदीकाठी गेल्यावर पाण्यात पाय घसरून पडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.