मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीच्या शिकारीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 19:26 IST2019-02-04T19:23:54+5:302019-02-04T19:26:12+5:30
डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीची शिकार करण्याचा प्रयत्न झाला, असा अंदाज आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीच्या शिकारीचा प्रयत्न
मुक्ताईनगर, जि.जळगाव : डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीची शिकार करण्याचा प्रयत्न झाला, असा अंदाज आहे. जीव वाचविण्याच्या धडपडीत जखमी नील गाय डोलारखेडा गावात घुसल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी नील गायीला ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या सुपूर्द केले असून, तिच्यावर उपचार करून जंगलात सोडण्यात आले आहे.
वडोदा वनहद्दीत पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. डोलारखेड गावाच्या खालच्या बाजूस नील गायीची शिकार करण्यास वाघ तिच्या मागे लागला. वाघाने नील गायीच्या मागील उजव्या पायावर पंजा मारून जबर जखमी केले. वाघाच्या तावडीतून सुटका करीत जखमी नील गाय बेभान होत डोलारखेडा गावात येऊन थबकली, असा कयास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आश्रयाच्या शोधात नीलगाय जवळच गावचे पोलीस पाटील भागवत नागो इंगळे यांच्या कंपाउंडमधून थेट घरात घुसली. ग्रामस्थांनी या जखमी वन्यप्राण्याला पकडून जवळच वनविभागाच्या कार्यालयात आणून वनविभागाच्या सुपूर्द केले. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून तिच्यावर उपचार करण्यात आले व परत जंगलात सोडण्यात आले आहे.
पशुवैद्यकीय अधिकाºयांनी जखमा पाहून नील गायीवर वाघाने हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.
-डी.एम.धुळगुंडे, वनरक्षक, डोलारखेडा