नेहरू चौक मित्रमंडळातर्फे यंदा रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:01+5:302021-09-05T04:20:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गणेशोत्सव जसजसा जवळ येत जातो तसतशी बाप्पाच्या आगमनाची आतुरता वाढत जाते. यंदा १० ऑगस्ट ...

नेहरू चौक मित्रमंडळातर्फे यंदा रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गणेशोत्सव जसजसा जवळ येत जातो तसतशी बाप्पाच्या आगमनाची आतुरता वाढत जाते. यंदा १० ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. दुसरीकडे गणेश मंडळाच्या बैठका पार पडत आहेत. त्यातच शहरातील नेहरू चौक बहुउद्देशीय गणेश मंडळाचीसुद्धा नुकतीच कार्यकारिणी जाहीर झाली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी अजय गांधी, तर उपाध्यक्षपदी बिपीन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
नेहरू चौक मित्रमंडळाचे यंदाचे हे ३६वे वर्ष आहे. सहा वर्षांपासून जळगावचा राजा ही एकच मूर्ती मंडळाकडून स्थापन केली जात आहे. त्याचे मंदिरही स्थापन करण्याचा मंडळाचा मानस आहे. यंदा नेहरू चौक मित्रमंडळातर्फे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. नुकतेच पाटपूजन महानगरपालिकेच्या इमारत परिसरात करण्यात आले आहे.
उदय खातू यांनी घडविली मूर्ती
जळगावच्या राजाची मूर्ती लालबाग येथील प्रसिद्ध गणेश मूर्तिकार उदय खातू यांनी बनविली असून, त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईत अनेक मानाचे गणपती त्यांनी बनविले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांनी दिली. मूर्ती ही चार फुटाची आहे. दरम्यान, मुंबईचा लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, राममंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर आदी महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची देखावे आतापर्यंत साकारण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
..असा आहे यंदाचा उपक्रम
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे मंडळाकडून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न यंदा केला जाणार आहे. तसे कसे.. तर मंडळाच्या बाहेर एक रजिस्टर ठेवले जाईल. त्यात नोकरीची आवश्यकता असलेल्या तरुणांची नोंद केली जाईल, तर ज्या व्यक्तींना कामासाठी तरुणांची आवश्यकता आहे, अशांचीही नोंद केली जाणार आहे. गणेशोत्सवानंतर बेरोजगार तरुणांना कुठे कामासाठी जागा आहे, त्याची माहिती दिली जाणार आहे. चाळीसगावातील शंभर कुटुंबांना महिनाभराचे जीवनाश्यक वस्तू पाठविण्यात आल्याचीही माहिती गांधी यांनी दिली.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सचिव : जगदीश जोशी, कार्याध्यक्ष : जयदीप पाटील, खजिनदार संदीप रडे, सदस्य : पंकज पाटील, महेश ठाकूर, चेतन पाटील, पीयूष गांधी, वृषभ गांधी, अभिजित भावसार, तुषार पटेल, योगेश पाटील, अमोल भावसार आदी.