पेट्रोल टाकून महिलेला जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST2021-08-15T04:19:03+5:302021-08-15T04:19:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क एरंडोल : शेतावर मजूर महिला पाठविण्यावरून वाद होऊन एकाने दारूच्या नशेत मुकादम महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून ...

Attempt to burn a woman by throwing petrol | पेट्रोल टाकून महिलेला जाळण्याचा प्रयत्न

पेट्रोल टाकून महिलेला जाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

एरंडोल : शेतावर मजूर महिला पाठविण्यावरून वाद होऊन एकाने दारूच्या नशेत मुकादम महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. यात ही महिला २० टक्के भाजली आहे. ही घटना विखरण ता. एरंडोल येथे शुक्रवारी रात्री १०वाजेच्या सुमारास घडली.

मायाबाई अशोक पाटील असे या जळीत महिलेचे तर खुशाल तोताराम पाटील (बागुल) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मायाबाई पाटील ही इंदिरानगरमधील घरासमोर बसली होती. त्या ठिकाणी खुशाल पाटील हा आला. दारूच्या नशेत तिला शिवीगाळ केल्याने वाद झाला. त्यावर खुशाल याने आपल्याकडील दुचाकीतून पेट्रोल काढून मायाबाई हिच्या अंगावर टाकले व पेटवून दिले. आजूबाजूच्या लोकांनी तिला विझविले. यात ही महिला २० टक्के भाजली आहे.

समाधान सुक्राम गायकवाड याने एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. दरम्यान, पोलीस पाटील विनायक पाटील व काही ग्रामस्थांनी या महिलेला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला खुशालविरुद्ध भादंवि ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempt to burn a woman by throwing petrol