खंडणीसाठी अपहरणाचा डाव अरुण ओरडल्याने मानेवर घाव

By Admin | Updated: October 6, 2014 10:47 IST2014-10-06T10:47:19+5:302014-10-06T10:47:37+5:30

पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथील अरुण रणछोड पवार या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी मोतीराम रोहिदास पवार व मोरसिंग उर्फ पिंटू सोनू पवारला अटक केली आहे.

Arun shrugs for ransom | खंडणीसाठी अपहरणाचा डाव अरुण ओरडल्याने मानेवर घाव

खंडणीसाठी अपहरणाचा डाव अरुण ओरडल्याने मानेवर घाव

 

 
जळगाव : पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथील अरुण रणछोड पवार (वय-१४) या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी मोतीराम रोहिदास पवार व मोरसिंग उर्फ पिंटू सोनू पवार (दोघे रा.शेवगे तांडा, ता.पारोळा) या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथील अरुण रणछोड पवार (वय-१४) हा ३ ऑक्टोबर रोजी रामदेव महाराज मंदिरासमोरून नाल्यात शौचालयाला गेला होता. अज्ञात इसमांनी त्याचे अपहरण केल्याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या गुन्ह्याच्या तपासाची सूचना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना केली होती. 
या गुन्ह्याच्या तपासासाठी उपनिरीक्षक दहीहंडे, हे.कॉ. उत्तमसिंग पाटील, बापूराव भोसले, दिलीप येवले, संजय पाटील, विजय पाटील, ईश्‍वर सोनवणे, नरेंद्र वारुळे, विनयकुमार देसले, रवींद्र चौधरी यांचे पथक तयार करून सूचना केली. या पथकाने पैशांच्या देवाणघेवाणीतून व्यवहार झाल्याची गोपनीय माहिती काढली.
त्यानुसार या पथकाने शेवगे तांडा, मोंढाळा, पारोळा, पाचोरा, भडगाव, तालुक्यात तपास करून वेगवेगळ्या कारखान्याचे मुकादम व ऊसतोड करणार्‍या मजुरांची चौकशी सुरू केली. 
यादरम्यान शेवगे तांडा येथील मोतीराम रोहिदास पवार हा गुन्हा घडल्यापासून गावात नसल्याची माहिती समोर आली. तसेच मोरसिंग उर्फ पिंटू सोनू पवार याच्यासोबत अरुण पवार याला शेवटचे पाहण्यात आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
मोरसिंगला चौकशीसाठी ताब्यात
पथकाने मोरसिंग उर्फ पिंटू सोनू पवार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर त्याने मोतीराम पवार याच्या मदतीने अरुणचे अपहरण केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पथकाने मोतीराम पवार याला पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथून ताब्यात घेतले. 
अपहरण करून खंडणीचा डाव
पथकाने दोघांना अटक केल्यानंतर अरुण पवार याचे अपहरण आणि खुनाचा घटनाक्रम समोर आला. आरोपी मोतीराम पवार याने मुकादम रणछोड पवार याच्याकडून दोन लाख रुपये उसनवारीने घेतले होते. मात्र त्याला मोरसिंग याच्या वडिलांकडे कामाला जायचे होते. मात्र जोपर्यंत दोन लाख रुपये देत नाही तोपर्यंत दुसरीकडे कामाला जाता येणार नसल्याने मोतीराम पवार व मोरसिंग पवार यांनी अरुणच्या अपहरणाचा कट तयार केला. अरुणचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून तीन लाख रुपयांची खंडणी घ्यायची आणि त्यातील उसनवारीचे दोन लाख रुपये परत करून एक लाख रुपयांची दोघांमध्ये वाटणी करायची असा कट तयार केला होता.
शौचास जाण्याच्या बहाण्याने नेले
शुक्रवार, ३ रोजी दुपारी साडेचार वाजेपर्यंत अरुण पवार व मोरसिंग उर्फ पिंटू आपल्या मित्रांसोबत जि.प.मराठी शाळेच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळले. त्यानंतर दोघे जण आपापल्या घरी गेले. संध्याकाळी मोरसिंग याने अरुणला शौचाला जाण्याच्या बहाण्याने गावापासून लांब असलेल्या शेताकडे नेले होते. यादरम्यान, मोतीराम हा एका बाजरीच्या शेतात लपून बसलेला होता.
------------
अरुण पवार अरुण बाजरीच्या शेतात आल्यानंतर त्याला मोतीराम व मोरसिंग यांनी पकडले. दोघे जण आपल्याला का पकडत आहेत हे त्याच्या लक्षात न आल्याने त्याने आरडाओरड सुरू केली. दोघांनी ज्या ठिकाणी त्याला पकडले, त्या ठिकाणावरून ३0 ते ४0 फुटांवर रस्ता होता. अरुणच्या ओरडण्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने मोतीरामने त्याचा गळा दाबला, तर मोरसिंगने त्याचे पाय धरून ठेवले. अरुण मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी नाल्याच्या शेजारी एक खड्डा खोदून त्यात त्याला पुरले. त्यानंतर या दोघांनी अरुणच्या वडिलांना फोन करून अपहरण केल्याचे सांगितले होते. मयत अरुण व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. अरुण हा आठवीच्या वर्गातील विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी अरुणचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता तेथून मृतदेह उकरून काढला आहे. 

Web Title: Arun shrugs for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.