विद्युत खांब हटविण्यासाठीच्या निधीला विभागीय आयुक्तांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:47+5:302021-09-04T04:20:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या दीड कोटींच्या निधीला ...

विद्युत खांब हटविण्यासाठीच्या निधीला विभागीय आयुक्तांची मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या दीड कोटींच्या निधीला अखेर विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. हे काम लवकर मार्गी लागावे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून या निधीला मंजुरी मिळवून घेतली आहे. विभागीय आयुक्तांची मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच या पुलाचे कामदेखील सुरू होण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामात मुख्य अडथळा हा महावितरणचे विद्युत खांब हटविण्याचे काम ठरत आहे. हे खांब हटवले गेले नसल्याने, पुलाचे कामदेखील रखडत आहे. जोपर्यंत विद्युत खांब हटविले जाणार नाही तोपर्यंत पुलाचे कामदेखील होणार नाही. या रखडत जाणाऱ्या कामामुळे शिवाजीनगरातील नागरिक व जळगाव तालुक्यातील नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. राज्य शासनाची परवानगी मिळाल्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. या कामाला मंजुरी लवकर मिळाली तर पुढील कामाचा मार्ग सुकर होणार असल्याने, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व विभागीय आयुक्तांची व्हीसी झाली. आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत कामांबाबत संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांना दिली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनीदेखील या कामाचा निधीला मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र शनिवारी महापालिका प्राप्त होण्याची शक्यता आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सोमवारीच महापालिकेला मिळालेला निधी महावितरणकडे वर्ग करून विद्युत काम हटविण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘लोकमत’ने सातत्याने प्रश्न मांडल्यामुळेच प्रशासकीय कामाला आली गती
शिवाजीनगरवासीयांसाठी जळगाव तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने या विषयावर पाठपुरावा केला. यामुळेच प्रशासकीय यंत्रणेला जाग येऊन या कामासाठी गती आली असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. पाच लाख नागरिकांच्या प्रश्न असल्याने या पुलाचे काम आता कोणत्याही प्रश्नासाठी प्रलंबित राहणार नाही अशीही ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.