अवैध वाळू वाहतुकीने घेतला आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2023 15:49 IST2023-06-11T15:49:17+5:302023-06-11T15:49:30+5:30
अडावद : वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

अवैध वाळू वाहतुकीने घेतला आणखी एक बळी
नरेंद्र खंबायत
अडावद (जि. जळगाव) : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीने रविवारी आणखी एक बळी घेतला. वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणास धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. ही घटना अडावद ता. चोपडानजीक कृषी विद्यालयाजवळ रविवारी सकाळी ११:३० वाजता घडली.
राजेंद्र झिंगा धनगर (३० रा. कमळगाव ता. चोपडा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो अडावद-चोपडा मार्गावरील कृषी विद्यालयाजवळ पायी निघाला होता. वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने राजेंद्र यास जबर धडक दिली. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रवींद्र विजय कोळी (२९, रा. सुटकार ता. चोपडा) यास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत राजेंद्र धनगर याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.