निवडणूक कामासाठी नियुक्त आणखी एका शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 19:45 IST2019-04-13T19:29:10+5:302019-04-13T19:45:32+5:30
चाळीसगाव येथील घटना

निवडणूक कामासाठी नियुक्त आणखी एका शिक्षकाचा मृत्यू
कळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या आणखी एका शिक्षकाचा परतताना मृत्यू झाल्याची दुसरी घटना शनिवारी सायंकाळी चारला चाळीसगाव येथे घडली. अंबादास बळीराम चौधरी (वय ५४, रा.श्रीरामनगर, अमळनेर) असे या शिक्षकाचे नाव आहे.
अंबादास चौधरी हे निवडणूक प्रशिक्षणासाठी चाळीसगावला गेलेले होते. निवडणूक प्रशिक्षण आटोपून ते घरी अमळनेरकडे येण्यासाठी निघाले. मात्र चाळीसगाव येथे बसस्टॅण्डकडे जाताना रस्त्यात चक्कर येऊन पडले. तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
याआधी जामनेर येथील शिक्षक रामदास माणिक जाधव (वय ५१, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) यांचा जळगाव बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला होता.
अमळनेरला ढेकूसीम रोडवरील श्रीराम नगरात ते रहात होते. तेथेच त्यांनी आळंदी संस्थानचे अध्यक्ष मोठे बाबा यांचे लोकवर्गणीतून मंदिर बांधले आहे. ह.भ.प.अंबादास महाराज तावसेकर या नावाने ते ख्यातनाम कीर्तनकार होते. ते मूळचे चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रूक येथील रहिवासी आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.