भुसावळ : वाळूच्या डंपरचालकाला पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी किशोर ऊर्फ गोजोऱ्या व अमोल राणे यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दुसरा आरोपी अमोल राणे यास वांजोळा रोड, श्रीराम नगर भागातून अटक करण्यात आली.
तक्रारदार तथा ट्रकचालक मनोज चंदू कोळी (वय २७, रा. बांभोरी, ता.धरणगाव) हे शनिवार, १७ रोजी ९:३० वाजताच्या सुमारास घोडेपीर बाबा दर्याजवळ वाळूचा ट्रक खाली करीत असताना संशयित आरोपी किशोर ऊर्फ गोजोऱ्या जाधव व अमोल राणे (दोन्ही रा.भुसावळ) यांनी कोळी यांना चाकूचा धाक दाखवून वाळूच्या रॉयल्टीबाबत विचारणा करीत शिवीगाळ व मारहाण केली होती. शिवाय नाहाटा चौफुलीपर्यंत पाठलाग करीत पाच हजार रुपयांची खंडणी मागितली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
ट्रकचालक कोळी यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. शनिवारी रात्री किशोर ऊर्फ गोजोऱ्या जाधव यास अटक करण्यात आली होती, तर दुसरा संशयित आरोपी अमोल काशिनाथ राणे (२४), निवृत्ती नगर, भुसावळ यास मंगळवारी अटक करण्यात आली.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रवींद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, श्रीकृष्णा देशमुख, योगेश माळी, परेश बिऱ्हाडे, जीवन कापडे आदींनी आरोपींना ताब्यात घेतले. तपास सहायक निरीक्षक अनिल मोरे व नाईक समाधान पाटील करीत आहेत.